साईबाबा (१८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय अवलिया फकीर व संत होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
श्री साईसच्चरित ग्रंथातील अध्याय ४ अनुसार श्री साईबाबांचा जन्म, त्यांचे मातापिता, त्यांचा धर्म, जात आणि पंथ याबाबत कोणतीच माहिती अधिकृतपणे मिळू शकत नाही. भक्तांसाठी श्री साईबाबा एका तरुणाच्या रुपात शिरडीला निंबाखाली प्रकट झाले. श्री साईबाबा शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहत, जिला ते "द्वारकामाई" असे संबोधित. ते नित्य पांढऱ्या रंगाची मांजरपाटाची कफनी परिधान करत असत. ते डोक्यालाही पांढरे फडके बांधायचे. अनेक वर्षे तरटाचा तुकडा हेच त्यांचे आसन होते. साईबाबा आपला डावा हात लाकडी कठड्यावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करून धुनीजवळ बसत. हळूहळू त्यांची महती लोकांच्या लक्षात आली. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरून त्यांच्या अवतार कार्याच्या उत्तरार्धात त्यांनी हजारो लोकांना शिरडीकडे आकर्षित केले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दशकात सर्व पुजासाहित्यानिशी समारंभपूर्वक त्यांची पूजा सुरू झाली, आणि द्वारकामाईला राजदरबाराचे स्वरूप प्राप्त झाले. तरी देखील बाबांनी आपली साधी जीवनशैली बदलली नाही. भक्तांना त्यांचे ईश्वरी प्रेम आणि वरदान प्रत्यक्ष प्राप्त होत असे. बाबा भक्तांना आपला ईश्वर आाराधनेचा मार्ग बदलू देत नसत. साई या शब्दाचा अर्थ 'मालक' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “अल्ला मालिक" "श्रद्धा सबुरी" हे साईंचे बोल होते.
१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसऱ्याच्या दिवशी श्री साईबाबांनी शिर्डीत महासमाधी घेतली. बाबांच्या कृपेने आजही भक्तांना अनुभव येतो. त्यामुळे बाबांप्रती भक्तांची निष्ठा व सबुरी निर्माण होते. बाबांचे दरबारी आलेल्या भक्ताच्या सर्व व्यवहारी अपेक्षा, मनोकामना बाबांपर्यंत निश्चित पोहोचतात व ते त्या पूर्ण करतात. कोणीही बाबांचे दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नाही अशी सर्व सामान्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
साईबाबा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.