भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्हा या भागात असलेला हा एक छोटा किल्ला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ऐतिहासिक 'सहानगड' म्हणजेच सध्याचे सानगडी (सान=लहान, गढी=गडी) गाव. येथील भोसलेकालीन गडी म्हणजेच सहानगड किल्ला आजही आपल्या वैभवाची साक्ष देत अस्तित्वाशी झुंजतोय. येथील भव्य परकोट, तटबंदी, पडझड झालेले बुरूज, बाहुली विहिर, तोफ अशा ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार वस्तू पहावयास मिळतात.
भंडारा शहराच्या पुर्वेलाअसलेल्या साकोली पासून १७ कि.मी. अंतरावर सानगडी हे गाव आहे. सहानगड या लहानशा किल्ल्यावरूनच या गावाला 'सानगडी' हे नाव पडले आहे. गावाबाहेरील उंच टेकडीवर नागपूरचे रघूजी राजे भोसले यांनी १७३४ मध्ये हा किल्ला बांधला. किल्ल्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असून दरवाज्याच्या आतील भागास पहारेकऱ्यांसाठी देवडया असून येथील एका देवडीच्या आतील बाजुस कोठार आहे. दरवाजावर कोणत्याही प्रकारचे कोरीव काम अथवा शिल्प दिसून येत नाही. देखरेख नसल्याने किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पडक्या तटबंदी मधून गडावर प्रवेश होतो. आयताकृती आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर दीड एकर परिसरात पसरला आहे. मध्यभागी असलेल्या या बुरुजावरून संपूर्ण किल्ला व दूरवरचा परिसर दृष्टीस पडतो. गेल्या दोन वर्षाच्या काळात ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे या हेतूने सानगडी येथील गावकऱ्यांच्या पुढाकाराने गट्ट लावून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. किल्ल्याची तटबंदी व खालील भाग दगडांनी व वरील भाग विटांनी बांधला आहे. किल्ल्याची भिंत काही भागात गोलाकार आहे. प्रवेशद्वार मजबूत विटांचे असून मागील भागात चौकीदारासाठी एक कक्ष आहे. किल्ल्याच्या मधोमध एक गोलाकार तोफ फिरविण्याचे स्थान असून त्याचा आकार १० ते १२ मीटर आहे. त्यावर नव्याने भारताची राजमुद्रा उभारलेली आहे.
सहानगड किल्ला (भंडारा)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.