श्राद्ध

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

श्राद्ध

'श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.

पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. वडिलांच्या मृत्युतिथीला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. प्रत्येक गृहस्थाश्रमीला तीन प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते, असा समज आहे. मातृऋण, पितृऋण व समाजऋण. ही सर्व ऋणे पुत्राने/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात. श्राद्धविधी सुरू असतांना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो, असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता, पितामह, प्रपितामह, मातामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात असे मानतात. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. पितृपक्षात अन्नदान व गोग्रास यांचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यू पावलेल्याचे श्राद्धही महालयात (पितृपक्षात) त्याच तिथीवर करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →