वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

या विषयावर तज्ञ बना.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (स्वीडिश:नोबेलप्राइसेट इ फिसियोतदजि एलर मेडिसिन) हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१ पासून दरवर्षी दिले जाते. या शाखेतील पहिले पारितोषिक एमिल ऍडॉल्फ फोन बेह्रिंगला त्याच्या "रक्तपेशींद्वारे (प्लाझ्मा) उपचारपद्धतीसाठी, विशेषतः त्याच्या डिप्थेरियाविरुद्ध होणाऱ्या उपयोगासाठी, ज्याद्वारे वैद्यकशास्त्रातील एक नवे दालन खुले केले गेले व वैद्य व चिकित्सकांच्या हातात आजार आणि मृत्यूविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी आयुध दिले गेले", देण्यात आले.

वैद्यकशास्त्रातील हे पारितोषिक रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, शांतता या इतर चार शाखांमधील पारितोषिकांबरोबर देण्यात येते. नोबेल फाउंडेशनद्वारे नियमन केली जाणारी ही पारितोषिके सहसा जगातील सर्वोच्च सन्मान समजली जातात. आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युदिनी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.

२००८ चे वैद्यकशास्त्रातील पारितोषिक हराल्ड झुअर हाउजनला सर्व्हिकल कॅन्सरला कारणीभूत असलेल्या मानवी पॅपिलोमा विषाणूच्या शोधाबद्दल आणि फ्रांस्वा बार-सिनूसी व लुक माँतानिये यांना एड्सला कारणीभूत मानवी प्रतिकारशक्ती-अभाव (इम्युनोडेफिशियन्सी) विषाणूच्या (एच.आय.व्ही.) शोधांबद्दल देण्यात आले. १ कोटी स्वीडिश क्रोनाचे (अंदाजे १० लाख युरो; १४ लाख अमेरिकन डॉलर) बक्षिस तिघांत वाटून देण्यात येईल.

नोबेल पदकाच्या समोरच्या बाजूस कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल सभेचे पदक असा मजकूर व आल्फ्रेड नोबेलचे चित्र असते तर मागच्या बाजूस ग्रीक इतिहासातील जिनियस आपल्या मांडीत उघडे पुस्तक ठेवून खडकातील वाहणारे पाणी घेउन एका आजारी मुलीची तहान भागवत आहे असे निरुपण असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →