(१३ फेब्रुवारी १८९४ ते १६ जुलै १९८४)
इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे होय.वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर वा.सी.बेंद्रे ह्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार श्री.वा.सी.बेंद्रे यांचा जन्म दि.13फेब्रुवारी १८९४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे इंग्रजी चौथी ते मैंट्रीक पर्यंत मुंबई येथील विल्सन हायस्कूल मध्ये झाले. त्या काळी परीक्षेसाठी सोळा वर्षे वयाची अट होती. त्यामुळे व घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे चौदाव्या वर्षीच त्यांना जी.आय.पी. ऑडीटमध्ये बिन पगारी उमेदवारी पत्करावी लागली. तेथे ३ महिन्यात ते टंकलेखन शिकले व लघुलेखन पद्धतीचा अभ्यास करून अलेनब्रदर्स मध्ये नोकरीला लागले. १९१३ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी लघुलेखन (Short-hand) परीक्षेत पहिल्या नंबरने सुवर्णपदक घेऊन उतीर्ण झाले, त्यामुळेच नोकऱ्या त्यांच्यापुढे चालून आल्या. परंतु श्री. बेंद्रे ह्यांनी शिक्षणखात्या मध्येच स्थायिक होण्याचे ठरविले. १९१८ मध्ये ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. महाराष्ट्राचा १७ व्या शतकाचा इतिहास हे संशोधनांचे क्षेत्र बेंद्रे यांनी प्रामुख्याने निवडले. एक साधन-संग्राहक,साधनसंपादक,साधनचिकित्सक,संशोधक व इतिहासकार या विविध भूमिका समर्थपणे पार पाडल्या. सन १९२८ मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड "साधन चिकित्सा" हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. .हा ग्रंथ प्रसिद्ध करून विशेषतः नवीन अभ्यासक आणि संशोधक ह्यांना त्यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले.सरकारी नोकरीत असून देखील जे.पी.कॉव्हरनटन यांच्या पाठिंब्यामुळे ते इतिहास क्षेत्रात आले. सतत ते कार्यमग्न असायचे . अगदी तरुणपणी ते जेंव्हा पुण्याला आले तेव्हा सरकारी नोकर तर ते होतेच, स्टेनोग्राफर होते आणि भारत इतिहास मंडळाशीही संलग्न होते.वि.का.राजवाडे यांना गुरुस्थानी मानून संशोधनाचे काम त्यांनी सुरू केले व आपल्या गुरूंचीच संशोधनाचीच परंपरा पुढे चालविली. आपल्या गुरूंप्रमाणेच महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हे बेंद्रे यांचे ध्येय होते. 'स्वदेशीय व स्वकीयांच्या इतिहासाकडे आपलेपणाने पाहणे, इतिहास कालीन निर्भेळ कडु वा गोड सत्यातून आपला देश कोणती शिकवणूक घेऊन राष्ट्र जिवंत ठेवू शकेल अशा तऱ्हेचे विवेचन ही राजवाडे किंवा राष्ट्रीय इतिहासाची परंपरा होय', व हीच परंपरा बेंद्रे यांनी पुढे चालविली. इतिहास संशोधक बेंद्रे ह्यांचे अगाध कार्य, चिकाटी व इतिहासा विषयीचा त्यांचा अभ्यास पाहून ,१९३८ मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या इच्छेवरून श्री. खेर यांनी खास शिष्यवृत्ती देऊन वा.सी.बेंद्रे यांना सरकारी " हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर" म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले.
दोन वर्षात मराठ्यांच्या विशेषतः संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्या करिता इंडिया हाउस व ब्रिटिश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे २५ खंड होतील एवढी सामुग्री परत आणली. इंग्लंड मधील वास्तव्यामुळे बेंद्रे यांचे संशोधन-संकलन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले. जेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीनेकिंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र "शिवाजी महाराजांचे" चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. या वरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भ हीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते. शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली आहे ते छायाचित्र इतिहासकार वासुदेवराव बेंद्रे यांनीच एकेकाळी आपल्या परदेश दौऱ्यात हस्तगत केले होते पूर्वीच्या ऐतिहासिक नाटकांचा विचार करता ती बहुतांशी बखर वांडमयाच्या आधारे, ऐकीव व परंपरागत चालत आलेल्या माहितीच्या आधारे सजवलेली होती.संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली,त्यातील बहुतेक नाटकात संभाजी व्यसनाधीन, बदफैली ,व्यभिचारी, दुर्वतर्नी,असाच नाटककाराने उभा केला होता. बेंद्रे ह्यांना हे भावत नव्हते.संभाजी महाराजांचे चरित्र संशोधित केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात बरेच दिवस घोळत असावा. मंडळातील त्यांचे स्नेही श्री पांडोबा पटवर्धन यांनी या विषयाच्या संशोधना साठी त्यांचे कडे विशेष आग्रह धरला होता. या विषयाकडे श्री बेंद्रे यांचे लक्ष इ.स.१९१८ पासून वेधले गेले. यासाठी ते कोठेही असोत साधने जमवीतच गेले. अखेरीस अडी- अडचणीन वर मात करून परदेशातही शोध घेऊन या विषयासंबंधीची हजारो साधने त्यांनी एकत्रित केली, आणि त्यावर आधारित असा संभाजी महाराजांचा चरित्र ग्रंथ इ.स.१९५८ मध्ये लिहून पूर्ण केला. म्हणजे त्यांची सुमारे ४० वर्षे या विषयासाठी खर्ची पडली. ह्या ग्रंथाने समाजात विलक्षण खळबळ उडवून दिली. त्याइ.स.१९६० मध्ये "संभाजी"चे खरे चरित्र आपणा सर्वांसमोर प्रसिद्ध झाले. ह्या ग्रंथाने समाजात महाराष्ट्र इतिहास संशोधन क्षेत्रात वा.सी.बेंद्रे यांचे नाव संभाजी महाराजांवरील त्यांचे प्रदीर्घ संशोधन व संभाजी महाराजांची पारंपारिक प्रतिमा बदलून नवी प्रतिमा उभे करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्ति रेखाच बदलली. त्यामुळे संभाजी महाराजांची पराक्रमी,संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी,धोरणी,मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा उंचावली गेली. संभाजी महाराजांचे चरित्र प्रकाशित करून वा.सी.बेंद्रे यांनी महत्तम कामगिरी केली आहे. संभाजी महाराजांची व्यक्तिरेखाच बदलली गेल्यामुळे आधीचेवांडमयीन न लेखन त्याज्य ठरले. बेंद्रे यांनी सर्व विवेचन साधार आणि संशोधनाच्या पायावर उभे केले. या चरित्रामुळे स्वाभिमानी,धर्मनिष्ठ ,पराक्रमी,संस्कृत जाणकार अशा संभाजी राजा बद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले.त्या आधारे संभाजी महाराजांच्या जीवनातील सर्व विसंगती त्यांनी निपटून काढल्या. बेंद्रे यांनी यासाठी ऐतिहासिक कागदाचा चिंटोराही दुर्लक्षित केला नाही. हे चरित्र खरया अर्थाने गाजले. अभ्यासकांना पुनरभ्यास करण्यास त्याने प्रवृत्त केले. चरित्रातील नव्या अभ्यासावर आधारित "इथे ओशाळला मृत्यू " किंवा "रायगडाला जेव्हां जाग येते " अशी मनोविज्ञानाचा आधार घेतलेली आणि संभाजी महाराजांची नवीनच व्यक्तिरेखा साकारणारी प्रा.कानेटकरान सारख्यांची नाटके रंगमंचावर यशस्वी होवू लागली. शिवाजी सावंतांच्या 'छाव्याने' हेच दर्शविले.या नव्या कलाकृतीं बरोबर नव्या इतिहास अभ्यासकांना अधिक वाव मिळाला. “शिवपुत्र संभाजी" सारख्या पी.एच.डी च्याग्रंथासाठीही डौ.सौ.कमल गोखले यांनी संशोधना साठी बेंद्रे यांच्याच संशोधनाचा आधार घेतला. आपण पाहिलं तर नंतरच्या काळामध्ये कमलाताई गोखल्यांचा प्रबंध असेल,कानेटकरांची नाटके असतील, संभाजी महाराजांचे खरं स्वरूप दाखवणारी ठरली,पण त्याचा पाया रचला तो इतिहास संशोधक बेंद्रे यांच्या संभाजी महाराजांच्या चरित्राने रचलेला आहे. इतिहास साधनांच्या प्रचंड पर्वताच्या उत्खननाच्या उलाढालींत जुना लोकप्रसिद्ध धर्मवीर परंतु दुर्गुणी संभाजी न सापडता एक महान विभूति असलेला संभाजी गवसला.धर्मांकरितां आत्यंतिक यातनांच्या अग्नीमध्यें शौर्याने व धीराने उभा राहून प्राणविसर्जित करणारा संभाजी दुर्व्यसनी, खुनी व धर्मभोळा म्हणून आजपर्यंत इतिहासलेखकांनी व नाटककारांनी दाखविला आहे. तत्त्वचिंतकाच्या दृष्टीनें हें एक न उलगडलेले कोडें होते. जिवंतपणी शरीराचे तुकडे होत असतां,डोळे काढले जात असतां, शरीर सोलले जात असतां जो धर्मनिष्ठेनें देहातीत रहातो व आपल्या धर्मनिष्ठेच्या अंतिम कसोटीस उतरतो तो आयुष्यभर देहधर्माचा दास म्हणून वागतो,ही घटना सुसंगत वाटत नाहीं,अतर्क्य वाटते.आतां बेंद्रे यांनी या वैचारिक कोडयांतून कायमची सुटका केली आहे.मराठ्यांच्या विषयीं गैरसमज असलेला मुसलमान इतिहासकार काफिखान संभाजीस शिवाजीपेक्षां सवाई समजतो,याचा उलगडा या चरित्राने होतो. हे चरित्र खरया अर्थाने गाजले,अभ्यासकांना पुनरभ्यास करण्यास त्याने प्रवृत्त केले. ह्या ग्रंथास सुद्धा साहित्य अकादमीने पुरस्कृत केले आहे.पुराव्यशिवाय आपण काहीही लिहित नाही असे त्यांचे म्हणणे होते आणि ते खरेही होते प्रारंभी संभाजी महाराजांची समाधी तुळापूर मध्ये आहे असा समज होता. कालांतराने व विषय संदर्भ मिळाल्या नंतर ही मूळ समाधी वढू-बद्रूक येथे असल्याचे बेंद्रे यांच्या ध्यानात आले. व अपार कष्ट करून त्यांनी अखेर संभाजीच्या समाधीचा शोध लावला व आजही तो अनमोल ठेवा फार वाजत गाजत साजरा केला जातो .
१९४८ मध्ये पेशवे दप्तरात संशोधन अधिकारी नेमले. पेशवे दप्तरखान्याचे अधिकारी असताना बेंद्रे ह्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या दृष्टीने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली आहे. पेशवे दप्तरात सुमारे ४ कोटी ऐतिहासिक कागदपत्रांचे विस्कळीत संकलन होते. ह्या कागदपत्रांचे कॅटलॉगिंग करणे, विषय-वार विभागणी करणे, हे अभ्यासकाच्या उपयुक्ततेचे कार्य हे वा.सी.बेंद्रे यांनीच मार्गी लावले.त्यांना संत वांग्मयाचाही गाढा अभ्यास होता. संत तुकाराम महाराजांबद्दल ही ह्यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे. तुकाराम महाराजांची चरित्रे , तसेच त्यांच्या काव्याचे समालोचन करणारे ग्रंथ यापूर्वी अनेक अभ्यासकारकांनी लिहिले आहेत,पण तुकोबांच्या गाथेत तीन गुरूंचा नामोल्लेख करणाऱ्या केवळ एका अभंगाच्या आधारे ,त्यांचा साधार शोध घेण्याचा प्रयत्न एकट्या बेंद्रे ह्यांनीच केला आहे.त्यांच्या ह्या ग्रंथामुळे संत तुकारामविषयक अभ्यासाला एक स्वतंत्र परिमाण मिळाले आहे . साहित्याच्या संशोधनक्षेत्रात अनन्वय अलंकाराप्रमाणे शोभून दिसावा असा आहे. १९६३ मध्ये मुंबई-मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाचे डायरेक्टर म्हणून ते मुंबईत आले. बरीच वर्षे त्यांनी या संस्थेची सुत्रे सांभाळली. "महाराष्ट्रेतिहास परिषद" या संस्थेचेही १९६५ पासून ते प्रमुख कार्यवाह होते. इतिहास संशोधनाचा एवढा प्रपंच बेंद्रे उभा करतात याचे कारण शोधपद्धत्ती आणि शोधसामुग्री याच्या वर त्यांची घट्ट पकड होती, अर्थात ती त्यांनी परिश्रमपूर्वक सिद्ध केली होती. वासुदेवराव बेंद्रे केवळ इतिहास संशोधकच नाहीत ते एक चतुरस्त्र लेखक होते. ऐतिहासिक विषयांबरोबरच त्यांनी विविध विषयांवर लेखन केलेले होते. १८९६ ते १९८६ अशी नव्वद वर्षांची त्यांच्या आयुष्याची वाटचाल. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय माणसाला भारभूत व्हावी अशी ही आयुर्मर्यादा. पण बेंद्रे ह्यांना हे आयुष्य सुद्धा कमीच ठरले. १९७२ मध्ये त्यांनी ‘शिवचरित्र’ व १९७५ मध्येम्हणजेच त्यांच्या वयाच्या ८o च्या सुमारास राजाराम महाराज चरित्र प्रकाशित करून आपली जीवनावरील निष्ठा आणि प्रवृत्ती-अभिमुखता सिद्ध केली . त्यांनी अनेक इतिहाससंग्रह इंग्रजी भाषेत लिहिलेले आहेत. त्यांनी विद्यार्थीसंघटना, ब्रदरहुड स्काऊट संघटना वगैरे विविध स्वरूपाच्या संघटना काढून सामाजिक कार्यात भाग घेतला.त्याकाळी हुंडाविरोधी मोहीम सुद्धा त्यांनी काढली होती.
१६ जुलै १९८६ साली त्यांचे निधन झाले.आपल्या कामावर इतकी निष्ठा असणारा विद्वान विरळाच. बेंद्रे ह्यांनी आपल्या दीर्घ आयुष्यात चौफेर वाचन व अखंड लेखन करण्याचे व्रत शेवट पर्यंत पाळले. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत इतिहास संशोधक वासुदेव सीताराम बेंद्रे सारख्या महर्षींचा वाटा फार मोठा आणि अतिशय मोलाचा असा आहे. बेंद्रे ह्यांचे ध्येय, जिद्द आणि धडपड मात्र आपल्या सर्वांना सदा सर्वकाळ प्रेरणा देत रहातील ह्यात मात्र शंका नाही!
वासुदेव सीताराम बेंद्रे (जन्म : पेण,रायगड जिल्हा-महाराष्ट्र, १३ फेब्रुवारी १८९६; मृत्यू १६ जुलै १९८६) हे महाराष्ट्रातील एक इतिहासकार होते.छत्रपती शिवाजी महाराजांची आज सर्वमान्य असलेली जन्मतिथी-फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, (१९ फेब्रुवारी, सन १६३०)- ही नक्की करण्याचे अभूतपूर्व काम वा.सी. बेंद्रे यांनी केले. त्यापूर्वीच्या असंख्य इतिहासकारांनी दिलेली तिथी-इ.स. १६२७, शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख शुक्ल तृतीया- ही आता महाराष्ट्रात तरी ग्राह्य धरली जात नाही.
१. त्यांचे दुसरे महनीय कार्य म्हणजे, १९३३ साली त्यांनी शोधलेले आणि प्रसिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र होय . १९३३ सालापर्यंत एका मुस्लिम सरदाराचे चित्र हे शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून प्रचलित होते. हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांवरील अन्याय नव्हता तर संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासावर अन्याय होता. इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधलेले हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेन्टाइन यांच्या सांगण्यावरून काढलेले चित्र होते. या चित्रामध्ये त्याने अत्यंत उत्कृष्टपणे शिवाजीमहाराजांचा पेहराव दाखविला असून, तो पूर्वी प्रचलित असलेल्या चित्रातील मुस्लिम सरदाराच्या पेहरावाहून भिन्न आहे.
२. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चित्र शोधानंतर उल्लेखनीय अशी त्यांची भरीव कामगिरी म्हणजे संभाजी महाराजांचे चरित्र होय. वा. सी. बेंद्रे यांच्या ४० वर्षांच्या अथक संशोधनाने, तोपर्यंत जनमानसात असलेली संभाजी महाराजांची नकारात्मक प्रतिमा खोडली गेली, आणि एक लढवय्या मराठी राजा अशी त्यांची प्रतिमा पुढे आली. आपल्या संशोधनाच्या साहाय्याने त्यांनी वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी शोधून काढली. आपल्या कामावरील निष्ठा आणि प्रेम हे वा.सीं.चे गुण ते महाराष्ट्राचे सच्चे भूमिपुत्र असल्याची साक्ष देतात. त्यानंतरच्या काळात अनेक लेखक, कलाकार यांनी वा. सी. बेंद्रे यांच्या साहित्याचा आणि लिखाणाचाच आधार घेऊनच संभाजी महाराजांची प्रतिमा साकारली.
३. वा.सी. बेंद्रे यांचे संशोधन फक्त मराठा राज्याचे व राजांचे जीवनकार्य मांडण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ज्यांनी मराठेशाही रुजण्यासाठी अपार मेहनत घेतली अशा तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वांचाही परामर्ष त्यांनी घेतला आहे. त्यांनी शोधून काढलेले अप्रकाशित संतांचे अभंग याचीच साक्ष देतात. हे अभंग त्यांच्या मृत्यूनंतर १९८६ साली प्रसिद्ध झाले.
४. सत्तर वर्षांपेक्षाही जास्त कालखंडात त्यांनी इतिहास संशोधनावर आधारित ६० च्यावर पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेली पुस्तके ही, इतिहास संशोधन हे कसे शास्त्रीय कसोटीवर आणि वस्तुस्थितीला धरून असणारे असले पाहिजे याची उत्तम उदाहरणे आहेत. लिखाण करत असताना कोणतेही नाट्य तसेच कपोकल्पित वाटणार नाही याबाबत ते सावध असत. त्यामुळे बेंद्रे यांची काही पुस्तके जगभरातील नावाजलेल्या वाचनालयात तसेच अमेरिकेच्या व्हाईट हाउसच्या वाचनालयात पाहायला मिळतात.
५. त्यांनी लिहिलेले 'साधन-चिकित्सा ' हे पुस्तक इतिहास संशोधन करणाऱ्यांना आजही पथदर्शक ठरते आहे. हे संशोधन करताना ते अत्यंत दक्षतेने आणि काटेकोरपणे कसे केले पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी लिहिलेले हे पुस्तक अशा प्रकारचे एकमेव पुस्तक असून त्या प्रकारचे पुस्तक एकही मराठी इतिहासकाराने लिहिल्याचे दिसत नाही.
६. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र लिहून वा.सी. बेंद्रे थांबले नाहीत तर, त्याच बरोबर बरेच संशोधन करून त्यांनी इतरही पुस्तके लिहिली. उदा० शहाजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे वडील), मालोजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे आजोबा), संभाजी भोसले (शिवाजी महाराजांचे वडील बंधू ), राजाराम, आदिलशहा, कुतुबशहा आणि राजा जयसिंग. बेंद्रे यांनी या व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून मराठेशाही रुजवण्यास कोणत्या घटना व प्रसंग कारणीभूत ठरले हे शोधून काढले. फार थोड्या व्यक्तींनी या पर्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
७. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाचे अस्सल उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेले 'शिव-चरित्र' (शिवाजीचे चरित्र). हे लिहिण्यापूर्वी बेंद्रे यांनी दोन वर्षे इंग्लंडमध्ये व युरोपात वास्तव्य करून ब्रिटिश म्युझियम तसेच युरोपातील विविध म्युझियममधील कागदपत्रांचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी या ठिकाणाहून गोळा केलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे जहाजाने भारतात आणली. यामुळे जो कालखंड दुर्लक्षित राहिला होता त्यावर प्रकाश पडला. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक सत्ये समोर येऊ शकली, त्यापैकी एक म्हणजे शिवाजी महाराजांची तलवार. ही तलवार 'जगदंब’ म्हणून ओळखली जात होती, 'भवानी तलवार ' म्हणून नव्हे हे बेंद्रे यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
८. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे असे जनमानसावर अधिराज्य असणारे व्यक्तिमत्त्व. त्याचमुळे महाराष्ट्रसरकारने अनेक विद्वानांना शिवाजीचे चरित्र लिहिण्याचे आवाहन केले. त्यासाठी अनेक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले आणि भरपूर मानधनाचीही तयारी दाखवली, परंतु लिखाणाचे हे शिव धनुष्य पेलण्यासाठी कोणीही पुढे येईना. फक्त वा. सी. बेंद्रे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या हे आव्हानात्मक काम स्वीकारले. हे लिखाण म्हणजे त्यांच्या समर्पण वृत्तीचे आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेचे फळच आहे.
९. वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत किचकट असे चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा दप्तराच्या दस्तऐवजाचे वर्गीकरण व जुळणी करण्याचे, तसेच कॅटलॉगिंगचे काम चिकाटीने अल्पावधीत पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्यावर तंजावर दप्तराचे कॅटलॉगिंग करण्याची जबाबदारी, मद्रास राज्याचे तत्कालीन मुखमंत्री राजगोपालाचारी यांनी दिली. जे काम पूर्ण होण्यास पाच वर्ष कालावधीची अपेक्षा सरकारने केली होती, ते काम वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत चिकाटीने अवघ्या दोन वर्षात पूर्ण केले. त्यांचे हे कार्य केवळ त्यांच्या अफाट कार्यक्षमतेची, जिद्दीची आणि परिश्रमाची परिणती आहे.
१०. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी 'राजाराम महाराज चरित्र'हा ग्रंथ लिहिला.
वासुदेव सीताराम बेंद्रे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!