लहुजी राघोजी साळवे

या विषयातील रहस्ये उलगडा.

आद्यक्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. काहीवेळा त्यांचा उल्लेख 'लहुजी वस्ताद' नावाने देखील केला जातो. लहुजींचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या नारायण पेठेमधील पूर्वीच्या मांगवाड्यातील एका हिंदू मांग कुटुंबात झाला. लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील पुरुषांकडून मिळाले होते. त्यांचे वडील राघोजी साळवे देखील लढवय्ये होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज काम करत. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती. त्यांच्या कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना "राऊत" ही पदवी दिली होती.

दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मावळली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे. .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →