राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा सहायक भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारास सादर केला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले. विजेत्याला "रजत कमळ" (चांदीचे कमळ) प्रमाणपत्र आणि ₹२,००,००० रोख बक्षीस दिले जाते. ५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२००६) पासून ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०२१) पर्यंत रोख पारितोषिक ₹५०,००० होते. ५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२००६) पूर्वी, रोख पारितोषिक ₹१०,००० होते.
राज्य पुरस्काराने १९८४ मध्ये सहायक अभिनेत्रीची श्रेणी सुरू केले गेली. या पुरस्कारच्या पहिला प्राप्तकर्ता रोहिणी हट्टंगडी होत्या, ज्यांना हिंदी चित्रपट पार्टी (१९८४) मधील कामगिरीबद्दल ३२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी २०२२ पर्यंत हिंदी, मल्याळम, तामिळ, बंगाली, मराठी, उर्दू, इंग्रजी, मैतेई (मणिपुरी), ओरिया आणि हरियाणवी अशा दहा प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी हे पारितोषिक मिळवले आहेत. २०२२ पर्यंत, ३७ वेगवेगळ्या अभिनेत्रींना एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
२०२२ पर्यंत सुरेखा सिक्री यांना त्यांच्या हिंदी चित्रपटांसाठी तीन वेळा सन्मानित करण्यात आले आहे - तमस (१९८७), मम्मो (१९९४) व बधाई हो (२०१८). त्यांच्या खालोखाल के. पी. ए. सी. ललिता (मल्याळम चित्रपट अमरम (१९९०) व शांथम (२०००)), नीना गुप्ता (हिंदी चित्रपट वो छोकरी (१९९३) व उंचाई (२०२२)) आणि पल्लवी जोशी (हिंदी चित्रपट द ताश्कंद फाइल्स (२०१९) व द काश्मीर फाइल्स (२०२१)) या तिघींनी दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. शिप ऑफ थिसियस (२०१३) या इंग्रजी-हिंदी चित्रपटातील कामगिरीबद्दल ६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात गौरविण्यात आलेल्या इजिप्शियन अभिनेत्री आयदा अल-काशेफ हा पुरस्कार जिंकणारी एकमेव अ-भारतीय अभिनेत्री आहे. उर्वशी आणि कल्पना हा सन्मान मिळालेले एकच बहीणींचे जोडपे आहे. १९९९, २०१२ आणि २०१३ या वर्षात दोन अभिनेत्रींमध्ये विभागून पुरस्कार दिले गेले आहेत.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अशा दोन्ही श्रेणींमध्ये शर्मिला टागोर, कोंकणा सेन शर्मा आणि कंगना राणावत या तीन अभिनेत्रींनी पुरस्कार मिळवले आहेत. डॉली आहलुवालिया या एकमेव अभिनेत्री आहे ज्यांनी सर्वोत्कृष्ट वेशभुषेचे देखिल दोन पुरस्कार पटकावले आहे. उत्तरा बावकर यांना १९९५ मधील मराठी चित्रपट दोघी बद्दल विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री
या विषयावर तज्ञ बना.