राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका (अधिकृतपणे सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी रजत कमल पुरस्कार म्हणून ओळखला जातो) हा १९६८ पासून भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दरवर्षी दिला जाणारा भारतीय चित्रपट उद्योगातील चित्रपटांच्या गाण्यांसाठीचा सन्मान आहे. १९५४ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांना "चित्रपटांचे राज्य पुरस्कार" असे म्हणले जात असे. १९६८ मध्ये "सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका" श्रेणीची स्थापना केली गेली. २०२१ पर्यंत, संयुक्त विजेते व पुनरावृत्तीचे विजेत्यांचा लेखाजोखा लक्षात घेऊन, भारत सरकारने ३० विविध महिला पार्श्वगायिकांना एकूण ५३ पुरस्कार प्रदान केले आहेत.

१९७४ पर्यंत, या श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र मिळत असे. १९७५ पासून, त्यांना "रजत कमळ" (रौप्य कमळ), प्रमाणपत्र आणि रोख रक्क्म मिळत असे. २०१२ मध्ये ५०,००० (US$१,११०) ची रोख देण्यात आली आहे.

भारतीय चित्रपट उद्योग २० हून अधिक भाषा आणि बोलींमध्ये चित्रपटांची निर्मिती करत असला तरी, 'रजत कमल' पुरस्कार प्राप्त झालेल्या महिला पार्श्वगायिकांनी नऊ प्रमुख भाषांमध्ये त्यांचे सादरीकरण केले आहे: तमिळ (पंधरा पुरस्कार), हिंदी (चौदा पुरस्कार ), तेलुगू (सात पुरस्कार), मराठी (सहा पुरस्कार), बंगाली (सहा पुरस्कार), मल्याळम (चार पुरस्कार), कन्नड (एक पुरस्कार), आसामी (एक पुरस्कार) आणि कोकणी (एक पुरस्कार).

प्रथम पुरस्कार प्राप्तकर्ता पी. सुशिला होत्या, ज्यांना १९६८ मध्ये १६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०२१ पर्यंत, सर्वाधिक 'रजत कमल' पुरस्कार जिंकणारी महिला पार्श्वगायिका म्हणजे के.एस. चित्रा आहे जिला सहा विजय मिळाले आहे. त्यानंतर पी. सुशिला आणि श्रेया घोषाल प्रत्येकी पाच विजयांसह आहेत. एस. जानकी यांनी चार वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. दोन महिला पार्श्वगायिका - लता मंगेशकर आणि वाणी जयराम यांनी तीनदा, तर तीन महिला पार्श्वगायिका - आशा भोसले, अलका याज्ञिक आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी दोनदा पुरस्कार जिंकले आहेत. श्रेया घोषालने पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये तिच्या सादरीकरणासाठी पुरस्कार जिंकला असून, त्यानंतर एस. जानकी आणि के.एस. चित्रा, या दोघांनीही तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये सादरीकरणासाठी पुरस्कार जिंकले आहे. संध्या मुखर्जी आणि श्रेया घोषाल या एकमेव प्राप्तकर्त्या आहेत ज्यांना एकाच वर्षी दोन भिन्न चित्रपटांमधून दोन प्रस्तुतींसाठी पुरस्कार मिळाला आहे. घोषाल ही एकमेव प्राप्तकर्ता आहेत ज्यांना दोन भिन्न भाषांमधील दोन भिन्न चित्रपटांमधून दोन प्रस्तुतींसाठी पुरस्कार मिळाला आहे. के.एस. चित्रा आणि रूपा गांगुली ह्या अश्या प्राप्तकर्ते आहेत ज्यांना एकाच वर्षी एकाच चित्रपटातील दोन प्रस्तुतींसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. वाणी जयराम आणि लता मंगेशकर या अश्या प्राप्तकर्त्या आहेत ज्यांना एकाच वर्षी एकाच चित्रपटातील त्यांच्या विविध सादरीकरणासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. २०२१ पर्यंत, वयाच्या दहाव्या वर्षी पुरस्कार प्राप्त करणारी उत्तरा उन्नीकृष्णन ही सर्वात तरुण प्राप्तकर्ता आहे, आणि वयाच्या ६२ व्या वर्षी हा पुरस्कार प्राप्त करणारी ननजम्मा सर्वात वयस्कर प्राप्तकर्ता आहेत. लता मंगेशकर आणि आशा भोसले ही एकमेव भावंडांची जोडी आहे जिला हा पुरस्कार मिळाला आहे. १९७३ मध्ये २१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या श्रेणीत कोणताही पुरस्कार देण्यात आला नाही. श्रेया घोषाल या पुरस्काराची सर्वात अलीकडील प्राप्तकर्ता आहे जिला तमिळ चित्रपटातील " मायवा छायावा" गाण्यासाठी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →