रानभाज्या

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रानभाज्या

शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येताात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात.





जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम असून या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यान्नातील अविभाज्य घटक आहेत.

भारतातील जंगली आणि पहाडी भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात कोरकू, गोंड, भिल्ल, महादेव कोळी, वारली, अशा ४७ जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी १५३०पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत. कोळी, गोंड, गोवारी, ढिवर या चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य आदिवासी जमाती दैनंदिन खाद्यान्नात सुमारे २५ रानभाज्यांचा उपयोग करीत असल्याचे समोर आले आहे.त्यांना ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते. तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे आणि त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थ बनवितात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न यांपासून तयार केले जाते. एवढेच नव्हे, तर पोळ्यांसाठीही याच वनस्पती वापरतात. सुमारे १४ वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवरही औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →