राजूर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राजूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील गाव आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागातील ही मुख्य बाजारपेठ आहे.

राजूर म्हंटले की अलगदपणे जीभेवर रेंगाळणारी पेढ्याची चव. राजूर चा प्रसिद्ध कंदी पेढा राज्यात देशात नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध झालाय तो म्हणजे नवाळी पेढेवाले, पन्हाळे पेढेवाले, नईम तांबोळी पेढेवाले, माळवे पेढेवाले यांच्यामुळे. राजूर तसे पाहिले तर एक छोटसं तालुका लेव्हलच खेडे गाव, चाळीसगाव डांगाणाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. सोमवार हा येथील आठवडे बाजारचा दिवस या दिवशी राजूर च्या व्यापारी वर्गासाठी एक कमालीचा आनंदी दिवस. सकाळपासून वर्दळ, नाश्त्यासाठी हाॅटेल फुल. बाजारात भाजीपाला विकणाऱ्यांची दुकान लावण्यासाठी सुरू असणारी धडपड सर्वकाही मजेशीर. बाहेरगावाहून आलेल्या लोकांची वेगवेगळ्या दुकानात जाऊन खरेदी करून परत माघारी जाण्याची घाई. शाळा, कॉलेजात जाणाऱ्या मुलांचे जथ्थे, गाड्यांचे आवाज सर्व कसे विलोभनीय...

राजूर शिक्षणासाठी सुद्धा एक पाऊल पुढे टाकत आहे त्यामध्ये मोलाची भर घालण्याचे काम जि. प. शाळा, के. पि. बी. एम. शाळा, प्राजक्ता डायमंड शाळा, सह्याद्री इंग्लिश मेडिअम स्कूल, सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कन्या विद्यालय, पिचड विद्यालय, अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नर्सिंग विद्यालय, अंगणवाडी या आणि अशा अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. आरोग्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु या अतिदुर्गम भागातील नागरिकांना पुरेशी किंवा योग्य वेळी योग्य उपचार होईल इतपर्यंत नाही. त्यात लवकरात लवकर सुधारणा होणे आवश्यक आहे.

राजूर मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणाहून अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई येथे जाण्यासाठी सार्वजनिक बस (एसटी) त्याचबरोबर खाजगी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे. बसस्थानक म्हणावे तसे नाहीये कारण याठिकाणी बसडेपो असणे ही काळाची गरज आहे. शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी जायचे असेल तर अनेकदा तासनतास बसची वाट पाहत थांबावे लागते. रात्री उशिरा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय कमी प्रमाणात या ठिकाणी असल्याने अनेकदा खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो किंवा ज्या ठिकाणी कामानिमित्त गेलो असेल तिथेच मुक्काम करावा लागतो. यात सुधारणा होणे गरजेचे आहे.

राजूर मध्ये आजमितीला दोन राष्ट्रीयीकृत बँका व एक जिल्हा बँक आहे. यात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या महत्त्वाच्या दोन बँका व अहमदनगर जिल्हा बँकेचा समावेश होतो. त्याचबरोबर चार एटीएम केंद्रे सुरू आहे.

राजूर च्या आजूबाजूच्या परिसरात विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जाऊ शकतात. यामधे राजूर च्या पश्चिमेस 10 किमीला रंधा धबधबा आणि त्याच्याच पुढे 10 किमी वर आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय (भंडारदरा धरण) आहे. तसेच पुढे गेल्यास रतनवाडी येथील रतनगड, हेमाडपंथी अमृतेश्वर मंदीर आहे. तेथून पुढे गेल्यावर नेकलेस फाॅल, जगप्रसिद्ध सांदणदरी, घाटघर उदंचन प्रकल्प, कोकणकडा अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. याठिकाणाहून परत आल्यास शेंडी हे महत्वाचे ठिकाण आहे. येथूनच जवळ असलेल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई ला जाता येते. राजूर च्या उत्तरेला गेल्यावर आशिया खंडातील दोन नंबरचा धरणावरील उंच पुल आपणास पहायला मिळतो. राजूर च्या दक्षिणेला गेल्यास हरिश्चंद्रगड, कोथळ्याचा बहिरोबा, धारेराव (कुमशेत) कोकणकडा, शिरपुंजे येथील बहिरोबा, आजोबा डोंगर हे आणि असे अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली जाऊ शकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →