रवी पटवर्धन (जन्म : ६ सप्टेंबर १९३७; - डिसेंबर २०२०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २००हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती.
आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आले होते. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.
पटवर्धनांची आई नव्वदीपर्यंत ठणठणीत होती. नऊवारी नेसून बुलेटवर मागे बसून बिनधास्त फिरायची. तरुणपणी ती घोडेस्वारीसुद्धा करायची. तिची व्यायामाची आवड रवी पटवर्धन ह्यांच्यात उतरली.
"माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मृत्यू अटळ आहे. पण मी मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे," असे म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे ६ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणायला ‘मृत्यू’ जिंकला, पण म्हणून रवी पटवर्धन यांची ‘जिद्द’ हरली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते मृत्यूला झुंज देत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत सकारात्मक राहिले, हाच त्यांचा विजय.वयपरत्वे शारीरिक मर्यादा आल्यात, पण रवी पटवर्धन यांनी त्यांच्यापुढे हार मानली नाही. अखेरपर्यंत ते रंगभूमीची सेवा करत राहिले.
वयाच्या ८० व्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले.
रवी पटवर्धन मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहत होते. नोकरीच्या कालावधीत बँकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.
रवी पटवर्धन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.