योगिराज पैठणकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

योगिराज पैठणकर

योगिराज महाराज पैठणकर,(श्रीएकनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र पैठण) हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार , प्रवचनकार म्हणून सुपरिचित आहेत. शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज आहेत. घरात परंपरेने चालत आलेल्या वारकरी सांप्रदायाचे संस्कार असल्याकारणाने बालपणापासूनच परमार्थाप्रती त्यांना विशेष रुची निर्माण झाली. महाराज हे जेष्ठ आध्यात्मिक विभूती तथा श्रीएकनाथमहाराज संस्थानाधिपती श्री रंगनाथबुवा ऊर्फ भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांचे नातू. योगिराज महाराजांचे पारमार्थिक शिक्षण सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथे झाले असून तेथील कीर्तन परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. येथील चार वर्षांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर इ. स. २००५ पासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक कीर्तन व्याख्यानांच्याद्वारा वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. अनेक मोठमोठया व्यासपीठांवरून त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

इ. स. २००६ साली त्यांनी "शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन,पैठण" या सामाजिक संस्थेची स्थापना केली जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षपूर्तीचे औचीत्त्य साधत त्यांचेद्वारा "Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाद्वारे सर्व संतांचे वाङ्मय अभ्यासण्याची संधी उपलब्ध झाली असून जगभरातील हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

मिशनद्वारा इ.स. २०१८ सालापासून संत एकनाथ महाराजांच्या नावाने विविध सहा पुरस्कार देण्यात येत असून आजवर अनेक महान विभूतींना "भानुदास-एकनाथ पुरस्कार" हा वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित समाजाला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यात जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.गु.श्री मारोतीबाबा कुऱ्हेकर, जेष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे, श्री संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील ह.भ.प.श्री जितेंद्रनाथ महाराज (अंजनगावसुर्जी) गाथा मंदिर अध्यक्ष ह.भ.प.श्री पांडुरंगमहाराज घुले, अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेवगिरीजी महाराज, संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ सदानंद मोरे, रामायणाचार्य श्री हभप संजय महाराज पाचपोर आदींचा समावेश आहे.

इ.स. २०१८ मध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिरात असणाऱ्या श्रीसंत एकनाथमहाराज पाराचा जीर्णोद्धार करून त्याठिकाणी श्री योगिराजमहाराज यांच्या हस्ते व अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत श्री एकनाथमहाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

योगिराजमहाराज संचलित शांतिब्रह्म प्रकाशनाच्या माध्यमातून वारकरी भजनी मालिका, मराठी, संस्कृत व इंग्रजी या भाषेत संत एकनाथ महाराजांचे चरित्र प्रकाशित करण्यात आले असून पुढे लवकरच आणखी काही ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

इ.स. २०२४ साली श्रीक्षेत्र अयोध्या येथील श्री रामल्लाच्या मूर्ती स्थापनेआधी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा नासिक दौरा होता. या कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मोजक्या १४ जणांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी योगीराज महाराज हे एकनाथ महाराजांचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रित होते. संप्रदायाचे वतीने व महाराजांच्या हस्ते मोदीजींचा सत्कार करून संत एकनाथ महाराजांची मूर्ती व श्रीएकनाथकृत भावार्थ रामायण ग्रंथाची प्रत त्यांना भेट देण्यात आली होती. पुढे रामल्लाच्या स्थापनेवेळीही योगीराज महाराजांना अयोध्येस विशेष निमंत्रित म्हणून बोलाविण्यात आले होते.

इ.स. २०२३ ते २०२४ हे वर्ष संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे ४२५ वे तसेच ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचे ४५० वे वर्ष असल्याने श्रीक्षेत्र पैठण याठिकाणी एका भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आपल्याद्वारे करण्यात आले होते. यावेळी पुरी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराजांस विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यासह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांच्या सेवा याठिकाणी रुजू झाल्या. विशेष निमंत्रित म्हणून सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांनी सदरील कार्यक्रमास उपस्थिती लावून हजारोंच्या संख्येने उपस्थित समाजास संबोधित केले होते. या सप्ताहात एकनाथी भागवत ग्रंथाच्या परायणास दोन हजार वाचक बसले होते. तसेच श्री एकनाथी भागवताचे पारायण अवघ्या १.३१ मिनिटात करून एक विश्वविक्रम देखील प्रस्थापित करण्यात आला. श्री एकनाथी भागवत ग्रंथाची यावेळी हत्तीवरून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली.

इ.स. २०२५ ते २०२६ हे वर्ष संत एकनाथ महाराजांचे पणजोबा वैष्णववीर श्रीसंत भानुदास महाराजांच्या समाधी सोहळ्याचे ५१२ वे वर्ष तसेच नाथांचे सद्गुरू श्रीसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचे ४५० वे वर्ष असल्याने यावेळीही श्रीक्षेत्र पैठण येथे "गुरु-भक्ति- ऐश्वर्य- परंपरा महोत्सव" या नावाने एका भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आपल्याद्वारे करण्यात आले होते. यावेळी श्री एकनाथ महाराजांच्या ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचे पारायण करण्यात आले होते. मागील कार्यक्रमापेक्षाही या कार्यक्रमात भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला. पैठणच्या इतिहासातील सर्वात मोठी दिंडी मिरवणूक संपन्न झाली. यावेळी द्वारका पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री सदानंद सरस्वती स्वामी महाराजांस विशेष निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांच्या सेवांव्यतिरिक्त २७ कुंडी महाविष्णुयागचं आयोजनही पैठणमध्ये प्रथमच करण्यात आले.

वरील दोन्हीही कार्यक्रमांमुळे वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताहास सर्वार्थाने एक आदर्श प्रस्थापित झाला. यानंतर महाराष्ट्रात संपन्न झालेले अनेक सोहळे वरील दोन्ही कार्यक्रमांना आदर्श ठेवून झाल्याचे स्पष्टपणे जाणवते अशी अनेकांची भावना आहे.

संत एकनाथमहाराजांचे व सकल साधू संतांचे विचार हे केवळ सांगण्यासाठी नसून त्याचे आचरणही व्हावे या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीएकनाथ षष्ठीच्या दिवशी स्वतःच्या वाड्यात त्यांनी 'वारकरी-वैष्णव पाद्य पूजनास' सुरुवात केली आहे. वृत्तपत्रीय स्तंभ लिखाण, टेलिव्हिजनच्या माध्यमातून कीर्तन आणि संतांच्या वाङ्मयाचा प्रसार ते करीत आहेत.

संत एकनाथ महाराजांच्या अनेक चित्रांचा अभ्यास करून तसेच आधुनिक काळात ज्यांना ज्यांना संत एकनाथ महाराजांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष दर्शन झाले त्यांच्याशी चर्चा करून, स्वानुभवाने एकनाथ महाराजांचे चित्र व मूर्ती सर्वसामान्य भाविकांस सर्वप्रथम उपलब्ध करून दिली आहे.

पैठणच्या ऐश्वर्यात भर पडेल असे भव्य "श्री एकनाथी भागवत मंदिर" पैठणमध्ये असावे ही त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा सत्यात उतरताना दिसत आहे. हे मंदिर बांधण्याचा संकल्प त्यांचे द्वारा करण्यात आला असून यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. लवकरच याचे बांधकाम सुरू होत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →