यशवंत आंबेडकर

या विषयावर तज्ञ बना.

यशवंत आंबेडकर

यशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ - १७ सप्टेंबर १९७७), भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.

यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले होते. १९ एप्रिल १९५३ रोजी त्यांचे लग्न मीराबाई सोबत झाले. भैय्यासाहेबांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.

यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो. आपटे लिखित बौद्धपर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.

भैय्यासाहेबांची इंग्रजी उत्तम होती, तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर केला जात असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →