यमाई देवी मंदिर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

यमाई देवी मंदिर

शिव-पार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्तीस्वरुपिनी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुकादेवीचा अवतार मानले जाते. महाराष्ट्रात व अन्य राज्यांत यमाई देवीची अनेक उपपीठे (मंदिरे) आहेत; परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती वसलेले हे मंदिर यमाई देवीचे मुळ उगमस्थान असल्याने या ठिकाणास मुळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाईदेवी व्यतिरिक्त मुळपीठदेवी म्हणून देखील ओळखले जाते.

औंधासूर राक्षसाचा भक्तजणांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री जोतिबा दक्षिणेस (सध्याचे औंध) पर्वतावर चालून आले. परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली. दिव्यस्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नाथांस उमगले. तेव्हा जोतिबांनी आदिमायेस "ये माई" अशी साद घातली. जोतिबांनी घातलेली साद ऐकताच आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाईदेवीचा अवतार धारण केला. आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानीमाता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खड्ग, त्रिशूल, धनुष्य होते. पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी तहानेने व्याकूळ झालेला. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधात होते. औंधसूराचे आणि देवीचे निकराचे तुंबळ युद्ध झाले. देवी प्रचंड क्रोधीत झाली होती. तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले. अशाप्रकारे मुळमाया यमाई देवीने औंधसूराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले.

आख्यायिकेनुसार कोल्हापूरच्या देवी महालक्ष्मी अंबाबाई, दख्खनचा राजा श्री जोतिबा आणि प्रभू श्रीराम (भगवान विष्णू) तिला "ये माई" असे संबोधत; म्हणून ती "यमाई" या नावाने प्रसिद्ध झाली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची यमाई देवी ही थोरली बहीण म्हणून ओळखली जाते कारण यमाई हे शिवपार्वती यांचे एकत्रित स्वरूप असून ती पार्वती आणि रेणुका देवीचा संयुक्त अवतार मानली जाते. रेणुका अवतार कृतयुगात आणि तुळजाभवानी अवतार त्रेतायुगात घडल्याने या कालक्रमानुसार यमाई तुळजाभवानीची मोठी बहिण मानली जाते. त्यामुळे बरेच भाविक तुळजाभवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या यमाईदेवीच्या प्रसिद्ध बारा पीठांपैकी एक उपपीठ असलेल्या उत्तर सोलापुरातील मार्डी किंवा मुळपीठ म्हणजेच औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळतात; परंतु विशेष बाब म्हणजे तुळजापूर क्षेत्री देखील यमाई देवीचे जागृत स्थान असून ते तुळजाभवानी मंदिर संकुलातच असण्यामुळे भाविकांना दोन्ही बहिणींचे एकत्र दर्शन घेता येते, ही एक धार्मिक सुलभता मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →