मेहरुन्निसा दलवाई (जन्म : २५ मे १९३०; निधन : ८ जून २०१७) या हमीद दलवाई ह्यांच्या पत्नी असून त्यांच्या पश्चात मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या अग्रणी होत्या. हमीद दलवाई यांच्याशी १९५६ मध्ये त्यांचा इस्लामिक पद्धतीने विवाह झाला आणि एक महिन्याच्या आतच त्यांनी विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवाहाची नोंदणी केली. उर्दू भाषिक मेहरुन्निसा दलवाई यांनी काही दिवसांतच मराठी भाषा अवगत केली. त्यांच्या दोन्ही मुली, रुबिना आणि इला यांनी आंतरधर्मीय विवाह केल्याने त्या अनुक्रमे रुबिना चव्हाण आणि इला कांबळी झाल्या.
शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा म्हणून मेहरुन्निसा यांनी संघर्ष केला. त्यांनी १९८६-८७ मध्ये महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चा काढला होता.
पतीच्या निधनानंतर गेली चाळीस वर्षे त्यांचे विचार सातत्याने पुढे नेण्यात मेहरुन्निसा यांची महत्त्वाची भूमिका होती. 'हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.
मुस्लिम समाजातील समाजसुधारणा चळवळी, मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांबद्दलच्या चळवळी आणि आंदोलने यांत मेहरुन्निसा यांचा सक्रिय सहभाग असे. आपल्या कार्यात त्या अखेरपर्यंत व्यस्त होत्या.
हमीद दलवाई यांनी समाजसुधारणेचा पायंडा घालून देण्यासाठी आपल्या अंतिम इच्छेनुसार मुस्लिम असूनही मरणोत्तर आपल्या देहाचे दहन करावे, असे त्याकाळी सांगितले होते. मेहरुन्निसा दलवाई यांनी त्याही पुढे एक पाऊल पुढे जात, आपल्या देहदानाचा निर्णय आधीच घेतला होता. त्यानुसार, पुणे शहरातल्या हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान केले गेले.
मेहरुन्निसा दलवाई
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?