माधवी पुरी-बुच या सेबीचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या पहिल्याच महिला आहेत.
अहमदाबादच्या ‘आयआयएम’मध्ये त्या शिकल्या. तेथून आयसीआयसीआय बँकेत १९९७ पासून विविध पदांवर त्यांनी काम केले. अर्थात नाव घेण्याजोगी उच्चपदे त्यांना एकविसाव्या शतकात (२००२-०३ : हेड ऑफ प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, २००४-०६ : हेड ऑफ ऑपरेशन्स) मिळाली. आयसीआयसीआय बँकेत सुमारे तपापेक्षा अधिक काळ काढून, २००९ मध्ये त्या ‘आयसीआयसीआय सिक्युरिटीज’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. या गुंतवणूक कंपनीचे हे प्रमुखपद त्यांनी २०११ पर्यंत सांभाळले. २०११ नंतर त्यांच्या प्रगतीचा दुसरा अध्याय सुरू झाला. सिंगापूरस्थित ‘ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल’चे प्रमुखपद (२०१३ पर्यंत) त्यांनी सांभाळले. २०१६ मध्ये, शांघायच्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’साठी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.
देशातील भांडवल-बाजारांचे नियंत्रण व नियमन करणाऱ्या ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे प्रमुखपद ही जबाबदारी माधवी पुरी-बुच यांच्याकडे आली. सेबीचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या पहिल्याच महिला, म्हणून त्यांचे स्वागत झाले असले तरी, वयाच्या ५६ व्या वर्षी या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या व्यक्ती आहेत. खासगी क्षेत्रात कारकीर्द केलेल्या व्यक्तीची ‘सेबी’च्या प्रमुखपदावर नियुक्ती पहिल्यांदाच झाली आहे. १ मार्चपासून त्यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांची ‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक झाली आणि ती ऑक्टोबर २०२१ पर्यंत टिकली. मात्र पुन्हा डिसेंबर २०२१ मध्ये त्यांची नियुक्ती सेबीला समभागांच्या दुबार/तिबार विक्रीवर लक्ष ठेवण्यास साह्य करणाऱ्या ‘सेकंडरी मार्केट्स कमिटी’वर झाली होती.
माधवी पुरी-बुच
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.