ज्ञानेश्वरांच्या काही काळ आधी महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला आणि मराठी भाषेचा आद्यग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला. ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, (तो महानुभाव पंथ), असे म्हणले जाते.
वि.भि. कोलते यांच्या मते (पहा : लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५) या संप्रदायाचे मूळचे नाव परमार्ग असे असून, महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले असल्याचे शं. गो. तुळपुळे म्हणतात.
समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वैदिक तत्त्वज्ञानाला बाजूला करून, ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला आणि सर्वच देवतांचे प्रस्थ कमी केले. देवतांच्या पूजेचा निषेध केला आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर हल्ला चढविला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, सकलजाती, बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय ठेवली. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले. धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या बौद्ध आणि जैन संप्रदायांप्रमाणो जनभाषेत आपले तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला.
श्री चक्रधरस्वामी आणि पुढे इतर संतांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते.
महानुभाव पंथ
या विषयावर तज्ञ बना.