भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ मिनिटांच्या अंतरावरील राणीचा बाग आहे. त्याच्या प्रवेशद्वारीच डावीकडे हे भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय (जुने नाव राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट म्युझियम) आहे. या इमारतीचें बांधकाम इटालियन रेनेसान्स शैलीचें असून त्यात भव्यतेबरोबर कलात्मकताही जाणवते. इ.स. १८५७ साली सर्वसामान्यांसाठी हे संग्रहालय खुले करण्यात आले.

इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती यांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या हेतूने हे वस्तुसंग्रहालय उभे राहिले आहे. मुंबईतील पहिले व कोलकाता, चेन्नईनंतर तिसरा क्रमांक या वस्तुसंग्रहालयाला आहे. मुंबई इलाख्याच्या अखत्यारीतीतील गव्हर्नमेन्ट सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियम असे त्याचे प्रारंभी नाव होते. कालांतराने मुंबई महापालिका आणि नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्‌स अँड कल्चरल हेरिटेज यांच्यात अखेरीस करार होऊन वारसा वास्तुसंवर्धन मार्गदर्शक तत्त्वप्रणालीनुसार इमारत आणि परिसराची पुनर्रचना करण्यात आली.

राणी व्हिक्टोरियाला 'एम्प्रेस ऑफ इंडिया' हा किताब बहाल केल्याप्रीत्यर्थ सरकारने दिलेली देणगी आणि लोकवर्गणीतून ही इमारत पूर्ण झाली. कलाप्रेमी नागरिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने वस्तुसंग्रहालयाचे कामकाज चालू शकते, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संस्था आहे. या इमारतीच्या बांधणीसाठी ४,३०,०००/- रुपये खर्च आला, त्यातील १,१०,०००/- रु. लोकांच्या वर्गणीतून दिले गेले तर उर्वरित रक्कम सरकारने उपलब्ध करून दिली.

उद्देश- संकल्पना निश्चित झाल्यावर मूळ उभारलेल्या वस्तुसंग्रहालयाची पुनर्रचना करण्यासाठी नेमलेल्या समितीत जॉर्ज बर्डवूड, जगन्नाथ शंकरशेठ आणि भाऊ दाजी लाड हे सदस्य होते. २ मे १८६२ रोजी या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होऊन १८७२ साली ती लोकांसाठी खुली करण्यात आली. या संस्कृतीरक्षक इमारतीचा आराखडा त्या वेळचे महापालिका अभियंता ट्रेसी यांनी तयार केला होता तर त्यात आवश्यकतेनुसार मेसर्स स्कॉट मॅक्ली लॅन्ड या वास्तुविशारद संस्थेने काही सुधारणा करून त्याला अंतिम स्वरूप दिले. ही वास्तू उभारण्यासाठी डॉ. भाऊ दाजी लाड यांनी अविश्रांत श्रम घेतले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर १९७५ला या वस्तुसंग्रहालयाला डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव दिले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →