भरतनाट्यम ही अतिशय प्राचीन अशी शास्त्रीय नृत्यशैली आहे. तिचा उगम तामिळनाडू प्रांतातील तंजावूर येथे झाला. भरतनाट्यमचे मूळ प्राचीन तमिळ नृत्य कुट्टू असल्याचे मानले जाते. देवळातील कोरीवकाम, लेण्या आदिमधून नृत्याच्या इतिहासाचा मागोवा घेता येतो. इसवीसनाच्या दहाव्या शतकापासूनचा काल हा आधुनिक नृत्याचा काळ मानला जातो. या काळात स्थापत्य, शिल्प, चित्र, संगीत अशा ललित कलांची भरभराट झाली. त्यांचा सर्वदूर प्रसार झाला आणि त्या अधिकाधिक विकसित होत गेल्या.
शास्त्रीय नृत्यशैली वेगवेगळ्या काळातील कलाकारांनी वेगवेगळ्या काळात आपापल्या कल्पनाशक्तीने फुलवल्या. हे कलाकार भिन्न भिन्न प्रांतातले, वेगवेगळ्या जातीजमातीचे, निरनिराळ्या सांस्कृतिक पूर्वपीठिकेचे होते त्यामुळे त्यांच्या सादरीकरणात त्या सर्वाचे प्रतिबिंब उमटले आणि एकाच नृत्याच्या विविध शैली निर्माण झाल्या. त्या त्या प्रांताचा इतिहास, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती, राजकीय घटना, सामाजिक रितीरिवाज यांचा प्रभाव नृत्याशैलीवर पडत गेला आणि त्यातून प्रत्येकीचे वेगळे सौंदर्य प्रकट झाले. प्रत्येक काळातील कलावंत, कलाशिक्षक यांनी कलेच्या वाढीस हातभार लावला. त्यातले कितीतरी लोक तर अल्पशिक्षित होते पण कलेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे.
नवनव्या कलाकारांच्या अभिनव कलाविष्कारांची भर पडत गेली. गुरूंची शिक्षण देण्याची पद्धत वेगवेगळी होत गेली आणि त्यातूनच भरतनाट्यम नृत्याची विविध घराणी निर्माण झाली. प्राचीन काळी मुख्यत्वे दोन प्रमुख घराणी मानली जात: एक तंजावूर घराणे आणि दुसरे पदनल्लूर घराणे.
भरतनाट्यम नृत्यशैलीची घराणी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.