भगवानलाल इंद्रजी (७ नोव्हेंबर, इ.स. १८३९ - १६ मार्च, इ.स. १८८८) हे एक भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि भारतविद्याविशारद होते. त्यांनी प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधनात योगदान दिले. त्यांनी तत्कालीन पद्धतीनुसार वेद, पुराणे आणि धर्मशास्त्र यांचा अभ्यास पाठशाळेत केला, तसेच वडिलांकडून संस्कृत आणि आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. जुनागढ येथे इंग्रजी शाळा नसल्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेचे औपचारिक शिक्षण मिळाले नाही; प्राचीन इतिहास आणि नाण्यांचा अभ्यास करताना त्यांना या मर्यादेची जाणीव होती.
जुनागढ संस्थानातील राजकीय प्रतिनिधी कर्नल लाँग यांनी लिपिशास्त्रज्ञ जेम्स प्रिन्सेप (१७९९–१८४०) यांना जुनागढ येथील अशोकाच्या आणि रुद्रदमनाच्या शिलालेखांचे ठसे पुरवले होते. प्रिन्सेप यांनी एप्रिल १८३८ च्या नियतकालिकात रुद्रदमनाच्या लेखाचा ठसा प्रसिद्ध केला होता. १८५४ च्या सुमारास कर्नल लाँग यांनी रुद्रदमनाच्या लेखाचा ठसा जुनागढचे नागरिक मणिशंकर जटाशंकर यांच्याकडे दिला, जो भगवानलाल यांच्या पाहण्यात आला. त्या ठशावरील अक्षरे नकलून घेऊन त्यांनी एशियाटिक सोसायटी, रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल आणि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थांच्या नियतकालिकांवरून लिपिशास्त्र आणि इतिहास संशोधन पद्धतीचा अभ्यास केला. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी रुद्रदमनाचा लेख वाचला आणि त्यातील राजाचे नाव ‘रुद्रदमन’ व तलावाचे नाव ‘सुदर्शन’ असल्याचे स्पष्ट केले.
भगवानलाल यांच्या काळात भारतीय इतिहास संशोधन क्षेत्रात मुंबई येथे बाळशास्त्री जांभेकर (१८१२–१८४६) व भाऊ दाजी लाड (१८२१–१८७४) हे संशोधक कार्यरत होते. भाऊ दाजी यांनी भगवानलाल यांना १८६२ मध्ये मुंबई येथे बोलावून घेतले व साहाय्यक म्हणून नियुक्त केले. त्यानंतर भगवानलाल यांनी नाशिक, कार्ले, भाजे, आणि नाणेघाट येथील शिलालेखांचे नवे ठसे घेऊन त्यांचा अभ्यास केला. त्यांनी अजिंठ्याच्या लेखांचे वाचन जेम्स बर्जेस (१८३२–१९१६) यांच्यासोबत केले.
भाऊ दाजी यांच्या प्रयत्नांमुळे जुनागढ संस्थानाकडून तसेच ब्रिटिश सरकारकडून भगवानलाल यांना आर्थिक साहाय्य मिळाले. या साहाय्यामुळे त्यांनी अफगाणिस्तान, बलुचिस्तान, नेपाळ, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील मंदिरे, प्राचीन अवशेष, नाणी व हस्तलिखितांचा अभ्यास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी नाणी, मूर्ती आणि शिलालेखांचा संग्रह केला. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये भगवानलाल यांचा नाण्यांचा, विशेषतः क्षत्रप राजांच्या नाण्यांचा अभ्यास होता. रॉयल एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष न्यूटन यांना त्यांनी नाण्यांवरील नहपान, रुद्रदमन व स्कंदगुप्त ही नावे स्पष्ट करून दाखवली. प्राचीन शिलालेखांतील अंक हे ब्राह्मी लिपीतील अक्षरे आहेत, हे मत त्यांनी मांडले.
जे. जी. बूलर, जेम्स बर्जेस आणि जेम्स कँपबेल यांसारख्या इतिहास संशोधकांनी भगवानलाल यांच्या कामाची दखल घेतली. भगवानलाल यांनी नाणेघाट शिलालेखातील अंक, सातवाहन राजांची नाणी, शिलाहार, त्रैकूटक व राष्ट्रकूट राजांचे ताम्रपट यांवरील संशोधन 'जर्नल ऑफ द बॉम्बे ब्रँच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी'मध्ये प्रसिद्ध केले. 'बॉम्बे गॅझेटिअर'मधील पुरातत्त्व विभागातील लेणी व शिलालेख यांवरील मजकूर भगवानलाल यांनी लिहिला. रुद्रदमनाचा लेख, अंक, नेपाळमधील हस्तलिखिते व गुजरातमधील लेख यांवरील त्यांचे संशोधन 'इंडियन अँटिकेरी' या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. शिलालेख व नाणी यांवरील त्यांचे सुमारे चाळीस लेख 'इंडियन अँटिकेरी' व 'जर्नल ऑफ द बॉम्बे ब्रँच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
जेम्स बर्जेस यांच्यासोबत त्यांनी 'इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम द केव्ह टेंपल्स ऑफ वेस्टर्न इंडिया विथ डिस्क्रिप्टिव्ह नोट्स' (१८८१) हा ग्रंथ लिहिला. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेने त्यांना मानद सदस्यत्व दिले. १८८२ मध्ये मुंबई सरकारने त्यांची मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र (फेलो) म्हणून नियुक्ती केली. १८८३ मध्ये 'रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ फायलॉलॉजी, जिओग्राफी अँड ॲन्थ्रॉपॉलॉजी ऑफ द नेदरलँड्स' या संस्थेने त्यांना मानद सदस्यत्व बहाल केले. तसेच रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेनेही त्यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती केली.
भगवानलाल यांनी क्षत्रप वंशीय राजांच्या नाण्यांचा संग्रह, मथुरा येथील सिंहस्तंभ आणि अनेक शिल्पे ब्रिटिश संग्रहालयाला दिली. हस्तलिखितांचा संग्रह त्यांनी मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीला दिला. त्यांनी आपली कागदपत्रे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या वाचनालयात भाऊ दाजी यांच्या कागदपत्रांजवळ ठेवावीत असे मृत्युपत्रात नमूद केले होते.
जलोदराच्या आजाराने मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
भगवानलाल इंद्रजी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.