फेरफॅक्स काउंटी तथा काउंटी ऑफ फेरफॅक्स ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फेरफॅक्स येथे आहे. व्हर्जिनियाच्या कायद्यानुसार ते एक स्वतंत्र शहर असल्यामुळे, फेरफॅक्स शहर या काउंटीचा भाग नाही.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,५०,३०९ इतकी होती. ही काउंटी व्हर्जिनियामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आहे, तसेच वॉशिंग्टन महानगर क्षेत्रातील आणि वॉशिंग्टन-बाल्टिमोर एकत्रित सांख्यिकीय क्षेत्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.
ही काउंटी देशाची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन, डी.सी.च्या उपनगरीय कड्याचा (सबर्बन रिंग) भाग आहे. या काउंटीचा बहुतांश भाग उपनगरीय असून काही भागात शहरी व ग्रामीण भाग आढळतो. याच्या उत्तरेला मॉन्टगोमेरी काउंटी (मेरीलँड), पूर्वेला फॉल्स चर्च, अलेक्झांड्रिया, आर्लिंग्टन काउंटी आणि प्रिन्स जॉर्जेस काउंटी (मेरीलँड), आग्नेयेला चार्ल्स काउंटी (मेरीलँड), नैऋत्येला प्रिन्स विल्यम काउंटी आणि वायव्येला लूडून काउंटी आहे.
या काउंटीमधील मॅकलीन शहरात राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या संचालकांचे (डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स) कार्यालय आहे. या काउंटीमध्ये अमेरिकेच्या चार गुप्तहेर यंत्रणांची मुख्यालये आहेत: लँगली येथील जॉर्ज बुश सेंटर फॉर इंटेलिजन्समध्ये सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए), फोर्ट बेल्व्हॉर येथे नॅशनल जिओस्पेशिअल-इंटेलिजन्स एजन्सी, शँटिली येथे नॅशनल रिकॉनिसन्स ऑफिस आणि मॅकलीन येथे नॅशनल काउंटरटेररिझम सेंटर आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात फेरफॅक्समधील जॉर्ज मेसन विद्यापीठाचे मुख्य आवार, शँटिली येथील सीआयए युनिव्हर्सिटी, रेस्टन येथील शेर्मन केंट स्कूल फॉर इंटेलिजन्स ॲनालिसिस आणि नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजची अनेक आवारे या काउंटीमध्ये आहेत. खाजगी व्यवसाय क्षेत्रात फॉर्च्यून ५०० कंपन्यांपैकी अकरा कंपन्यांची मुख्यालये या काउंटीमध्ये आहेत.
२०२० मध्ये फेरफॅक्स काउंटीचे सरासरी घरगुती उत्पन्न १२७,८६६ डॉलर्स इतके होते, जे संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च उत्पन्न होते.
फेरफॅक्स काउंटीची रचना १७४२मध्ये झाली. या काउंटीला थॉमस फेरफॅक्स यांचे नाव दिलेले आहे.
फेरफॅक्स काउंटी (व्हर्जिनिया)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?