पुणे मेट्रो

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पुणे मेट्रो

पुणे मेट्रो हा नागरी सार्वजनिक जलद परिवहन रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत आहे. मार्च २०१८ पर्यंत या प्रकल्पात तीन मेट्रो मार्गिकांचा समावेश आहे, ज्यांची एकूण लांबी ५४.५८ किमी असेल. मार्गिका क्र. १ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट अशी असेल. १६.५९ किमी लांबीची ही मार्गिका पिंपरीपासून रेंज हिल्सपर्यंत उन्नत व तिथून स्वारगटेपर्यंत भूमिगत मार्गाने धावेल. मार्गिका क्र. २ ही पूर्णतः उन्नत असून पौड रस्ता, कोथरूड येथील वनाझला नगररस्त्यावरील १४.६६ किमी अंतरावर असलेल्या रामवाडीशी जोडेल. या दोन्ही मार्गिका २०२१ मध्ये नागरिकांसाठी खुल्या होण्याचे अपेक्षित आहे. मार्गिका क्र. ३ ही हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क ते शिवाजीनगर अशी २३.३३ किमी लांबीची उन्नत मार्गिका असेल. शिवाजीनगर न्यायालय येथे बांधण्यात येणाऱ्या स्थानकावर तिन्ही मार्गिका एकमेकींशी जोडल्या जातील. मेट्रोच्या तीनही मार्गिका, वाहनतळे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस व बीआरटीसेवेसाठी एकत्रीकृत भाडे आकारणी व्यवस्था प्रस्थापित करण्यात येणार आहे, तथापि प्रत्यक्ष भाडे वापरल्या जाणाऱ्या सेवेवर अवलंबून असेल. ह्या व्यवस्थेअंतर्गत पीएमपीद्वारे सध्या वापरात असलेल्या 'मी कार्ड'चा रोकडविरहित व्यवहारासाठी उपयोग करण्यात येईल.

२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्गिका १ व २ चेभूमिपूजन करण्यात आले. ३१.२५ किमी लांबीच्या या दोन मार्गिका उभारण्यासाठी नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन या कंपनीची फेररचना करून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) या केंद्र व राज्य शासनांची ५०:५० भागीदारी असलेल्या कंपनीची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पासाठी ₹ ११,५२२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. मार्गिका क्र. ३ला केंद्र व राज्य शासनांची मान्यता मिळाली आहे. ही मार्गिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणार आहे. ह्या मार्गिकेसाठी ₹ ८,३३३ कोटी इतका खर्च अपेक्षित असून, केंद्र शासनाने ₹ १,३०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे तर राज्य शासनाकडून ₹ ८१२ कोटींचा निधी अपेक्षित आहे. पीएमआरडीए, केंद्र शासन व राज्य शासन मिळून प्रकल्पासाठी आवश्यक ४०% निधी उपलब्ध करतील तर उर्वरित ६०% निधी खासगी गुंतवणूकदाराकडून उभारण्यात येईल. पीएमआरडीए तर्फे मार्च २०१८ मध्ये मार्गिका ३ साठी निविदा मागविण्यात आल्या. या कामाचे कंत्राट टाटा रिअल्टी-सिमेन्स यांना देणार आहेत. प्रत्यक्ष काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →