पारिस्थितिकी ही जीवविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. सजीवांचे एकमेकांशी संबंध कसे असतात, त्यांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो, अजैविक घटकांवर ते कसे अवलंबून असतात आणि या घटकांवर सजीवांचा काय परिणाम होतो, हे पारिस्थितिकीच्या अभ्यासातून समजते. या शाखेत जीवविज्ञान, भूगोल व भूविज्ञान हे विषय एकत्र येतात आणि रसायनशास्र, भौतिकी आणि संगणकीय विज्ञान यांचा वापर त्यात होत असल्यामुळे पारिस्थितिकी ही एक आंतरज्ञानशाखा बनली आहे.
निसर्गात विविध प्रकारचे सजीव असतात. त्यांमध्ये वनस्पती व प्राणी यांसारखे जैविकदृष्ट्या प्रगत व जटिल सजीव असतात, तर कवके, अमीबा, जीवाणू इ. साधे व सरल सजीवही असतात. यांपैकी कोणताही लहान किंवा मोठा, साधा किंवा जटिल सजीव एकटा जगू शकत नाही. प्रत्येक सजीव कोणत्या ना कोणत्या प्रकारे इतर सजीव किंवा पर्यावरणातील अजैविक (निर्जीव) घटकांवर अवलंबून असतो. उदा., एखाद्या परिसरातील गवत नष्ट केले, तर त्या परिसरातील हरिणांसारखे प्राणी अन्नासाठी दुसरीकडे निघून जातात किंवा त्यांची उपासमार होते. अशाच रीतीने वनस्पती देखील पोषक घटक मिळविण्यासाठी त्यांच्या परिसरावर अवलंबून असतात. कारण प्राण्यांचे मलमूत्र तसेच मृत प्राणी व वनस्पती यांच्या ऱ्हासातून तयार होणारे घटक तेथील वनस्पतींसाठी गरजेचे असतात.
सजीवांचे अस्तित्त्व आणि सुस्थिती पर्यावरणीय आंतरसंबंधावर अवलंबून असल्यामुळे पारिस्थितिकीचा अभ्यास गरजेचा असतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात झालेला एखादा क्षुल्लक बदल आपल्यावर आणि आपल्या पर्यावरणावर परिणाम करू शकतो.
पारिस्थितिकी तज्ज्ञ निसर्गातील संघटनांचा अभ्यास तीन पातळीवर करतात:
समष्टी (पॉप्युलेशन) : एखाद्या ठिकाणी, कोणत्याही दिलेल्या काळी असलेल्या सजीवांच्या एखाद्या जातीतील (किंवा गटातील) सर्व सजीव.
समुदाय (कम्युनिटी) : एखाद्या ठिकाणी, दिलेल्या काळी परस्पर आंतरक्रिया असलेल्या सजीवांच्या विविध जातींतील सर्व सजीव.
परिसंस्था : जैविक समष्टी मिळून जैविक समुदाय होतो, समुदायाची त्याच्या सभोवतालच्या अजैविक घटकांशी आंतरक्रिया होत असते. असे समुदाय आणि अजैविक घटक मिळून परिसंस्था बनते.
पारिस्थितिकी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?