पांबन पूल (तमिळ: பாம்பன் பாலம்) हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे. मन्नारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी ह्या हिंदी महासागराच्या उपसमुद्रांवर बांधला गेलेला ६,७७६ फूट (२,०६५ मी) लांबीचा हा पूल रामेश्वरम द्वीपाला मुख्य भारतीय भूमीसोबत जोडतो. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम गावामध्ये फक्त ह्या पुलाद्वारेच प्रवेश शक्य आहे. वास्तविकपणे येथे रेल्वेवाहतूकीसाठी एक व मोटार वाहतूकीसाठी एक असे दोन वेगळे पूल अस्तित्वात असून दोन्ही पुलांना एकत्रितपणे पांबन पूल असेच म्हणले जाते.
२४ फेब्रुवारी १९१४ मध्ये वाहतुकीस खुला केला गेलेला पांबन रेल्वे पूल भारतामधील सर्वात पहिला सागरी पूल आहे व मुंबईमधील वांद्रे-वरळी सागरी महामार्ग बांधून पूर्ण होण्याअगोदर देशातील सर्वात लांब सागरी पूल होता. ह्या जुन्या पुलाच्या शेजारी १९८८ साली मोटार वाहतूक पूल बांधला गेला जो रेल्वे पूलाला पूर्णपणे समांतर धावतो.
१९१४ ते १९६४ सालापर्यंत चेन्नईच्या इग्मोर स्थानकापासून रामेश्वरम बेटाच्या धनुषकोडी ह्या गावापर्यंत मीटर गेज रेल्वे धावत असे. १९६४ सालच्या एका प्रलयंकारी चक्रीवादळामध्ये धनुषकोडी गाव पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर रेल्वेसेवा रामेश्वरमपर्यंतच चालवण्यात येते. २००० च्या दशकात भारतीय रेल्वेने येथील मीटर गेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर पूर्ण केले.
पांबन पूल
या विषयातील रहस्ये उलगडा.