पहिले इंडोचीन युद्ध

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पहिले इंडोचीन युद्ध

पहिले इंडोचीन युद्ध (फ्रेंच इंडोचीन युद्ध, फ्रान्स-व्हियेतनाम युद्ध; व्हियेतनामी: Chiến tranh Đông Dương) हे इ.स. १९४६ ते १९५४ दरम्यान फ्रेंच इंडोचीनमध्ये लढले गेलेले एक युद्ध होते. ह्या युद्धात फ्रान्स विरुद्ध व्हियेतनाममधील व्हियेत मिन्ह ह्या स्वातंत्र्यवादी गटादरम्यान लढत झाली.

इ.स. १८८७ सालापर्यंत फ्रान्सने संपूर्ण व्हियेतनाम ताब्यात घेऊन येथे फ्रेंच इंडोचीन ही वसाहत स्थापन केली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हा भूभाग जपानने बळकावला होता. महायुद्ध संपण्याच्या सुमारास व्हियेतनाममधील स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला. हो चि मिन्ह ह्या व्हियेतनामी कम्युनिस्ट पुढाऱ्याने व्हियेत मिन्ह नावाची आघाडीची निर्मिती केली. महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर जेव्हा फ्रान्सने पुन्हा इंडोचीनवर ताबा मिलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा व्हियेत मिन्ह व कंबोडिया व लाओसमधील कम्युनिस्ट पक्षांनी फ्रान्सविरोधात लष्करी बंड पुकारले व ह्या युद्धाची सुरुवात झाली.

७ वर्षांहून अधिक काळ चाललेल्या ह्या युद्धात फ्रान्सला अमेरिकेचा तर व्हियेत मिन्हला सोव्हिएत संघ व चीनचा पाठिंबा होता. अखेरीस उत्तर व्हियेतनामच्या गनिमी काव्यापुढे फ्रान्सला शरणागती पत्कारावी लागली व मार्च १९५४ मध्ये सुरू झालेल्या दियेन बियेन फुच्या लढाईमध्ये फ्रान्सचा सपशेल पराभव झाला व हे युद्ध संपुष्टात आले.

२१ जुलै १९५४ रोजी जिनिव्हा येथे झालेल्या एका परिषदेत इंडोचीनची फाळणी करण्याचे ठरले. उत्तर व्हियेतनाममध्ये हो चि मिन्हच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट राजवटीची तर दक्षिण व्हियेतनाममध्ये सम्राट बाओ दाईच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताकाची स्थापना झाली. दोन्ही तुकड्यांनी एकत्रीकरणाचे प्रयत्न करणे अपेक्षित होते. परंतु १९५६ साली सत्तेवर आलेल्या दक्षिण व्हियेतनामच्या गो डिन यीमने उत्तरेसोबत वाटाघाटीस नकार दिला. ह्यामध्येच व्हियेतनाम युद्धाची मुळे रोवली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →