इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीला शिवस्कंदवर्मा या पल्लव राजाने कृष्णेपासून पेन्नेरू नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणला. त्याच्यानंतरच्या विष्णूगोप या कांचीच्या पल्लव राजाचा समुद्रगुप्ताने पराभव केला. पुढे दिडशे वर्षे या भागात अराजक माजले पण सिंहविष्णू अवनीसिंह या राजाने अराजकाचा नाश करून पल्लवांची सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. त्याने चोळांचा पराभव करून तोंडमंडलम जिंकले. त्याने कलभ्र, पांड्य, चेर यांचा पराभव करून सिलोनच्या राजाचाही पराभव केला. याच्यामुळेच सार्वभौमत्वाच्या चढाओढीत पल्लवांचे पदार्पण झाले.
सिंहविष्णू अवनीसिंहानंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा पहिला महेंद्रवर्मन याने दक्षिणेत तिरुचिरापल्लीपर्यंत आपली सत्ता वाढवली. याने चैत्यकारी, चित्रकारपुली, मत्तविलास, विचित्रचित्त या पदव्या धारण केलेल्या होत्या. याने आपल्या कालखंडात अनेक देवळे बांधली. महेंद्रवाडी हे गाव वसविले व तेथे महेंद्र तलाव बांधला. त्याच तलावाच्या काठावर एक विष्णूमंदिर बांधले. याच मंदिरावरील शिलालेखात हे विटाविरहित, लाकूडविरहित, धातूविरहित व चुनाविरहित मंदिर विचित्रचित्तराजाने खोदविले असा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील चालुक्य राजांशी पहिल्या महेंद्रवर्मनाला अनेक वर्षे झगडावे लागले. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याने महेंद्रवर्मनाचा पराभव केला होता. पहिल्या महेंद्रवर्मनानंतर त्याचा पुत्र पहिला नरसिंहवर्मा गादीवर आला. त्याने इ.स. ६४२ मध्ये दुसऱ्या पुलकेशीचा पराभव करून त्याला युद्धात ठार मारले. त्यानिमित्त त्याने महामल्ल व वातापिकोंड या पदव्या धारण केल्या. सिलोनवर दोनदा नाविक स्वाऱ्या केल्या होत्या.
पल्लव वंश
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?