पनामा कालवा (स्पॅनिश: Canal de Panamá) हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो. इ.स. १९१४ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.
ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.
अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीमध्ये समावेश केला आहे.
पनामा कालवा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.