पंकज उधास

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पंकज उधास

पंकज उधास (१७ मे, १९५१ - २६ फेब्रुवारी, २०२४) हे एक गझल, हिंदी चित्रपट गीते आणि भारतीय पॉप गीत गाणारे गायक होते. उधास यांनी १९८० मध्ये आहट नावाच्या गझल अल्बम द्वारे आपल्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल, १९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये महेश भट्ट, यांनी नाम चित्रपटात "चिठ्ठी आयी है" या गाण्यासाठी त्यांची निवड केली आणि हे गाणे प्रचंड गाजले देखील. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन सुरू केले. भारताबाहेर देखील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. २००६ मध्ये, पंकज उधास यांना पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे भाऊ निर्मल उधास आणि मनहर उधास हे देखील गायक आहेत.



पंकज उधास यांचा जन्म गुजरातमधील जेतपूरच्या नवगढ गावात झाला. ते तीन भावंडांपैकी सर्वात धाकटे होते. त्यांच्या वडिलांचे नाव केशुभाई तर आईचे जितुबेन उधास होते. त्यांचा मोठा भाऊ मनहर उधास यांनी देखील बॉलीवूड चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून काम केले आहे. त्यांचे दुसरे भाऊ निर्मल उधास हे देखील एक प्रसिद्ध गझल गायक आहेत.

उधास यांचे शिक्षण भावनगर मधील सर बीपीटीआय विद्यालातून पूर्ण झाले होते. कालांतराने त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि पंकजने सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेतले.

उधास कुटुंब राजकोटजवळील नवगढ नावाच्या गावचे पारंपारिक जमीनदार होते. त्यांचे आजोबा गावातील पहिले पदवीधर होते आणि पुढे ते भावनगर राज्याचे दिवाण (महसूल मंत्री) बनले. त्यांचे वडील, केशुभाई उधास हे सरकारी नोकर होते आणि ते प्रसिद्ध वीणा वादक अब्दुल करीम खाँ यांच्या कडून दिलरुबा वाद्य वाजवायला शिकवले होते. उधास लहान असताना त्याचे वडील दिलरुबा हे तंतुवाद्य वाजवत असत. त्यांची आणि त्यांच्या भावांची संगीतातील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना राजकोट येथील संगीत अकादमीमध्ये दाखल केले. उधास यांनी सुरुवातीला तबला शिकायचे ठरवले होते पण नंतर त्यांनी गुलाम कादिर खान साहब यांच्याकडून हिंदुस्थानी गायन शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर उधास ग्वाल्हेर घराण्याचे गायक नवरंग नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला स्थलांतरित झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →