नासदीय सूक्त (ऋग्वेद, मंडल १०,सुक्त १२९) हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील १२९ वे सूक्त आहे. ‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं’ या सुरुवातीच्या ओळीवरून ते नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते. विश्वाच्या उत्पत्तीचे हे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन अनुमान आहे. यात एकूण सात ऋचा आहेत. या सूक्ताची रचना त्रिष्टुप् या छंदात असून देवता हे भाववृत्त आहे. यामध्ये विश्वाच्या निर्मितीचे श्रेय परमेश्वराला दिलेले नसून, सर्व देव हे उत्पत्तीच्या नंतर आले आहेत, असे मत मांडले आहे. या सूक्तात विश्वाच्या उत्पत्तीविषयी शंका व्यक्त केल्या आहेत तसेच त्यांची उत्तरे बरोबर आहेत की नाहीत अशाही शंका आहेत. एकमेवाद्वीतीय ब्रह्मामध्ये सर्वप्रथम ‘काम’ म्हणजे इच्छा निर्माण झाल्याने विश्वाचा जन्म झाला आणि पुढे सृष्टी वाढत गेली असा विचार यात मांडला आहे.
शंकराचार्य तसेच मध्वाचार्य यांनी याचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावर सायण या विजयनगर साम्राज्यातील विचारवंताने, तेराव्या शतकात रचलेली टीका 'सायणाचे भाष्य' या नावाने उपलब्ध आहे. या नासदीय सूक्ताचे लोकमान्य टिळक यांनी गद्य भाषांतर केले होते. हिंदी रूपांतर प्रा. वसंत देव यांनी केले आहे. ते भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेत शीर्षकगीत म्हणून वापरले गेले होते. या सूक्ताचा उल्लेख प्रसिद्ध नासाचे वैज्ञानिक कार्ल सेगन यांनी त्यांच्या कॉसमॉस ह्या पुस्तकात केला आहे.
नासदीय सूक्त
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.