दुर्गाबाई कामत (१८७९ - १७ मे, १९९७) भारतीय चित्रपटातील पहिल्या महिला अभिनेत्री होत्या.
१९०० च्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना चित्रपट किंवा रंगभूमीवर काम करण्यास मनाई होती. त्या काळात नाटकात काम करणाऱ्या महिलांना हीन दृष्टीने पाहिले जात असे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना आपल्या पहिल्या चित्रपटात म्हणजे 'राजा हरिश्चंद्र' मध्ये महिला कलाकाराच्या भूमिकेसाठी पुरुष कलाकारांचा वापर करावा लागला. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची पत्नी राणी तारामतीची भूमिका अण्णा हरी साळुंखे या पुरुष अभिनेत्याने साकारली होती. साळुंखे यांनी धार्मिक भावनेपोटी आपली मिशी काढण्यास नकार दिला होता. चित्रपटात त्यांची मिशी दिसून येऊ नये म्हणून दादासाहेब फाळके यांना खूप काळजी घ्यावी लागली होती.
इ.स. १९०३ मध्ये दुर्गाबाई कामत या आपल्या पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. त्यावेळेस त्यांची मुलगी कमला, ज्या लग्नानंतर कमलाबाई रघुनाथराव गोखले या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या, त्यासुद्धा त्यांच्या बरोबर राहात असत. आपला चरितार्थ भागवण्यासाठी दुर्गाबाई आणि कमला या दोघी मेळा आणि जत्रेत गाणी गाणे व विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या नाटकात काम करत असत. त्यानंतर दुर्गाबाई रंगमंचाशी जोडल्या गेल्या आणि त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीस योग्य ती सुरुवात झाली.
दादासाहेब फाळके यांनी इ.स. १०१३ मध्ये 'मोहिनी भस्मासूर' या आपल्या दुसऱ्या मूकपटाची निर्मिती केली. या दुसऱ्या चित्रपटात त्यांनी महिला कलाकारांना घेण्याचे ठरवले. दुर्गाबाई कामत यांनी या चित्रपटात देवी पार्वतीची छोटी भूमिका केली. अशा प्रकारे दुर्गाबाई भारतीय चित्रपटात काम करणारी पहिली महिला अभिनेत्री बनल्या. त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांनी त्याच चित्रपटात बाल कलाकार म्हणून मोहिनीची भूमिका साकारली होती. या दोघी माय-लेकी यांच्या या कामामुळे चित्रपटात आणि नाटकात काम करण्याकरिता भारतीय महिलांना मोठे प्रोत्साहन मिळाले.
दुर्गाबाई कामत यांचे नातू (आणि कमलाबाईंचा मुलगा) ज्येष्ठ मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले हे होते. चंद्रकांत गोखले तसेच त्यांचा मुलगा विक्रम गोखले यांनीसुद्धा त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.
दुर्गाबाई कामत
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.