दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ (जन्म: ११ सप्टेंबर, १९१५; - पुणे, १० जानेवारी, २०१४) हे पुण्यातील प्रसिद्ध सराफी पेढी पी.एन.गाडगीळ अँड सन्सचे मालक होते.
मूळचे कोकणातले असणारे हे गाडगीळ कुटुंब २०० वर्षांपूर्वी सांगलीमध्ये स्थिरावले आणि सराफी, सावकारी असा जोडव्यवसाय करत राहिले. २९ नोव्हेंबर १८३२ रोजी `गणेश नारायण गाडगीळ' या नावाने सराफी पेढीचा शुभारंभ झाला. पुढे सराफी व्यवसायात थोरले बंधू पु. ना. ऊर्फ आबा गाडगीळ, मधले गणेश नारायण ऊर्फ दादा (हे दाजीकाकांचे वडील) आणि तिसरे बापूकाका, अशा तिघांची भागीदारी होती. आबांची सत्शीलता, निर्व्यसनीपणा, समतोल वृत्ती, मितभाषी व्यवहार, जनहिताची तळमळ यांचा खोल ठसा दाजीकाकांवर उमटला. माधुकरीसाठी येणारे विद्यार्थी, जेवायला येणारे वारकरी, वाईचे, काशीचे विद्वान ब्राह्मण, सख्खे, सावत्र, चुलत नातेवाईक, सुना-मुलींचा गोतावळा असा सतत माणसांचा राबता असणाऱया सांगलीच्या घरात दाजीकाकांची जडणघडण झाली. वयाच्या विसाव्या वर्षी दाजीकाकांनी दुकानात पाऊल ठेवले आणि हा परिपाठ पुढे सत्तर वर्षे टिकून राहिला. `आधुनिक पाणिनी' म्हणून संबोधल्या जाणाऱया काशीनाथशास्त्री अभ्यंकर यांची पुण्यात राहणारी बुद्धिमान कन्या कमलाबाई दाजीकाकांच्या पत्नी होत.
दाजीकाकांनी पुण्यासारख्या चोखंदळ बाजारपेठेत १९५८ च्या प्रारंभी 'मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी' या नावाने दुकान थाटले. सांगलीहून आणलेले कुशल कारागीर आणि दाजीकाका व त्यांच्या पत्नी कमलाताई यांच्या आपुलकीमुळे पुणेकरांनी दाजीकाकांना आपलेसे केले. संपूर्ण कुटुंबाला व्यवसायात जोडून घेण्याचा धडा देत दाजीकाकांनी सोन्या-चांदीप्रमाणे हिरे-माणके आणि कालानुरूप ज्वेलरीच्या व्यवसायाचे कौशल्यही आत्मसात करून घेतले. हिरे व रत्नांचा स्वतंत्र विभागही सुरू केला. 'ब्रँड ॲम्बॅसिडर' नियुक्त करण्याची दाजीकाकांची कल्पना सराफी व्यवसायात चमकून गेली. बारकोड सिस्टिम, कॉम्प्युटराइज्ड रेकॉर्ड अशा आधुनिक माध्यमातून दाजीकाकांनी व्यवसायातील कालानुरूप व्यवस्थांशी लीलया जुळवून घेतले. गाडगीळांची आता सहावी पिढी या व्यवसायात आहे.
इ.स. १९७१ मध्ये दाजीकाकांचे चिरंजीव विद्याधर पुण्याच्या दुकानात कामाला लागले. आणि त्यांच्या लग्नानंतर सूनबाई वैशाली गाडगीळ हिशेबाची बाजू सांभाळू लागल्या. दाजीकाकांचे पुतणे अजित हेही दुकानाचे आधारस्तंभ बनले. पीएनजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पु.ना. गाडगीळ अँड सन्स या दुकानाच्या आज पुण्यात अनेक शाखा आहेत.
दाजीकाका गाडगीळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?