दाऊद दळवी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

प्राचार्य डॉ. दाऊद दळवी (जन्म : ठाणे-महाराष्ट्र, २० जानेवारी, इ.स. १९३७; - ठाणे, ३१ ऑगस्ट, इ.स. २०१६) हे एक इतिहासाचे अभ्यासक होते. प्राचीन इतिहास या विषयात डॉक्टरेट मिळविलेले प्रा. दळवी १९६१ मध्ये मुंबईतील पार्ले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर १९६५ ते १९८६ याकाळात मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात ते काम करीत. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्त्व अभ्यासमंडळाचे ते सदस्यही होते. १९८६ ते १९९८ या काळात ते ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते.

शाळेत असल्यापासूनच दाऊदसरांना इतिहासविश्वाची ओढ वाटे, या विषयाची उत्सुकता आणि कुतूहलामागे धावण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते इतिहासाचे आदर्श अध्यापक झाले. बंदिस्त वर्गापेक्षा दऱ्याखोऱ्या, किल्ले, लेण्या येथे ते अधिक रमत. पुस्तकांपेक्षा इतिहास जगण्याची त्यांची शिकवण आजही विद्यार्थी जपत आहेत. काहीसा रटाळ वाटणारा इतिहास खुमसदार शैलीत मांडून विद्यार्थ्यांना वर्गात खिळवून ठेवणारे आणि लेखणीतून वाचकांना महाराष्ट्राच्या इतिहासविश्वाची सफर घडविणारे ते प्राध्यापक होते.

डॉ. दाऊद दळवी यांनी कोकणच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकण्यासाठी तसेच ऐतिहासिक वास्तू व कागदपत्रे उजेडात आणण्यासाठी कोकण इतिहास परिषद स्थापन केली होती. अखेरपर्यंत या परिषदेचे ते अध्यक्ष होते. परिसरातील ऐतिहासिक दस्तऐवज संग्रहीत करण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ास स्वतंत्र वस्तुसंग्रहालय व्हावे, यासाठी ते अखेपर्यंत प्रयत्‍न करीत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →