दत्तात्रेय तुकाराम दत्तू बांदेकर (२२ सप्टेंबर, १९०९:कारवार, कर्नाटक, भारत - ४ ऑक्टोबर, १९५९:मुंबई) हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. काही काळ पुण्यात घालवल्यावर पुढे मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठमोठ्या विद्वानांपासून ते अगदी गावंढळापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने लोभविले.
आचार्य अत्र्यांचे ते उजवे हात होते. १९३४साली आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन मा.कृ.शिंदे यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाच्या पहिलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली होती. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली.
जुलै १९४०पासून बांदेकर आचार्य अत्र्यांच्या साप्ताहिक नवयुगमध्ये ’रविवारचा मोरावळा’ नावाचे सदर लिहीत.
चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ साप्ताहिकात ते प्रूफरीडर म्हणून लागले. पुढे 'चित्रा'तून त्यांनी 'तो आणि ती ' आजकालचे गुन्हेगार, सख्याहरी ' ही सदरे लिहिली. त्यातील 'सख्याहरीला' हे त्याच्या 'प्रेयसीने लिहिलेली पत्रे ' हे स्वरूप होते. त्यातून सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या भानगडी यासंबंधी चुटपुटीत भाष्य असे. टवाळकीच्या ढंगात लिहिलेले सदर जितके लोकप्रिय झाले तितकेच टीकेचेही धनी झाले. पुढे अत्र्यांच्या 'नवयुग ' मध्ये ते दाखल झाले आणि अखेरपर्यंत तेथेच राहिले.तील ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले. अत्र्यांच्या नवयुगमधून बांदेकरांनी लिहिलेली 'अक्काबाईचा कोंबडा', 'जग ही रंगभूमी', 'घारुअण्णांची चंची' ही सदरे लोकप्रिय झाली.
दत्तू बांदेकर स्वतः प्रसिद्धिपराङ्मुख होते. ते इतके लाजरे होते की कधी जनतेसमोर ते आले नाहीत. त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही की आपला फोटो काढू दिला. पां.वा. गाडगीळ यांनी एका लेखात लिहिले आहे की, "दत्तू बांदेकर इतके लाजाळे आणि एकान्तिक होते की आचार्य अत्र्यांनी मुद्दाम बोलावून आणि एकोणीस वर्षे ’नवयुग’मध्ये त्यांची लहर सांभाळून त्यांना ठेवले नसते तर, लेखक म्हणून दत्तू बांदेकर कधीच संपले असते.
त्यांचे मित्र मा.कृ.शिंदे यांना दत्तू बांदेकरांच्या नृत्याभिनयाच्या गुणाची चांगली कल्पना होती. पण शिंदे यांनी कितीही आटापिटा केला तरी दत्तूला ते रंगमंचावर आणू शकले नाहीत. दत्तू बांदेकर यांनी लिहिलेले ’विचित्र चोर’ हे नाटक रंगमंचावर आले खरे, पण पहिल्याच प्रयोगात आपटले. त्या नाटकाच्या सर्व उपलब्ध प्रती बांदेकरांनी जाळून टाकल्या.
दत्तू बांदेकरांच्या ’जावई शोध’ या दुसऱ्या नाटकाचा मात्र प्रयोग झाला. या नाटकाची भाषा कोकणीमिश्रित मराठी असून त्यात बांदेकरांनी कारवारमधील काळू नदीचे आणि निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे. १९५१ साली कारवारला अ.का. प्रियोळकर यांच्या अध्यक्षतेखाली जे मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यात या नाटकाचा प्रयोग झाला.
दत्तू बांदेकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.