दख्खन सुलतानशाह्या किंवा दख्खन सल्तनती (इंग्लिश: Deccan sultanates) या भारताच्या दक्षिण-मध्य भागातील दख्खन पठारावरील कृष्णा नदी आणि विंध्य पर्वतरांग यांच्या मधील प्रदेशात इ.स.च्या १५व्या शतकाच्या अखेरीपासून १६व्या शतकाच्या सुरुवातीस उदयाला आलेल्या पाच राजसत्ता होत्या. या सत्ता बहामनी सल्तनतीचे विघटन झाल्यानंतर पाच मुस्लिम सरदारांनी स्थापन केल्या. अहमदनगर, बेरार, बिदर, विजापूर आणि गोलकोंडा या १४९० पासून १५१२ दरम्यान बहामनी सलतनीतून फुटून निघाल्या.
यांतील अहमदनगरने १४९० मध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्य जाहीर केले; त्याच वर्षी विजापूर आणि बेरारनेही स्वातंत्र्य जाहीर केले. बिदर सुमारे १४९२ साली वेगळे झाले, तर गोलकोंडा १५१२ मध्ये स्वतंत्र झाला.
या सगळ्या पाच सल्तनतींचे शासक मुस्लिम होते. त्यांचे स्थापक वेगवेगळ्या पार्शवभूमीचे होते. अहमदनगर सल्तनतीतील निजामशाही घराण्याची स्थापना मलिक हसन बहरी या ब्राह्मण मूळच्या मराठी मुस्लिम व्यक्तीने केली; बेरार सल्तनत ब्राह्मण मूळच्या एका कन्नडिगा मुस्लीमने स्थापन केली; बिदर सल्तनतीचा स्थापक एक जॉर्जियन गुलाम होता; विजापूर सल्तनतीचा स्थापकी बहुधा जॉर्जियन गुलाम होता. हा मह्मूद गवानकडून विकत घेतला गेला असावा असा अंदाज आहे. आणि गोलकोंडा सल्तनत इराणी-तुर्कमेनी मूळ असलेल्या गुलामाने स्थापन केली.
दख्खन सल्तनतींनी आपली वैधता बहामनी सल्तनतीच्या उत्तराधिकारी राज्यांप्रमाणे मांडली आणि स्वतःची नाणी जारी करण्याऐवजी बहामनी नाणीच वापरणे सुरू ठेवले. सल्तनती परस्पर स्पर्धक असतानाही १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याविरुद्ध त्यांनी युती केली आणि तालिकोटा युद्धात विजयनगरला निर्णायक धक्का दिला. या संघर्षानंतर विजयनगरचे सामर्थ्य कायमचे क्षीण झाले. उल्लेखनीय म्हणजे, या युतीने विजयनगर शहराचा मोठा विध्वंस केला; महत्त्वाची मंदिरे जमीनदोस्त झाली.
१५७४ मध्ये बेरारमध्ये उठाव झाल्यानंतर अहमदनगरने आक्रमण करून बेरार जिंकून घेतला. १६१९ मध्ये बिदरचा विजापूरने ताबा घेतला. पुढे या सल्तनती मुघल साम्राज्याकडून जिंकल्या गेल्या: १५९६ मध्ये बेरार अहमदनगरकडून काढून घेतला गेला; १६१६ ते १६३६ दरम्यान अहमदनगर पूर्णतः जिंकण्यात आला; आणि औरंगजेबाच्या १६८६–८७ च्या मोहिमेत गोलकोंडा व विजापूर जिंकले गेले.
दख्खन सुलतानशाह्या
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.