इंग्रजी नाव - Cirrocumulus Cloud
संक्षिप्त खूण (Symbol) - Cc
हे उच्च पातळीवर आढळणारे पांढरे शुभ्र किंवा हलक्या राखाडी रंगाचे ढग असून बहुतांशी हिमकणांचे व थोड्या प्रमाणात अतिथंड अवस्थेतील जलबिंदूचे बनलेले असतात. अनेक ठिकाणी तुटल्यामुळे पांढरेशुभ्र व छोट्या छोट्या पुंजक्यांचा असा हा ढग असतो. समुद्रावर एकापाठोपाठ येणाऱ्या लाटांप्रमाणे किंवा बांगडा माशांच्या शरीरावरील खवल्यांप्रमाणेअशा ढगांची मांडणी आकाशात पहावयास मिळते. हे ढग विरळ व कमी जाडीचे असल्यामुळे आणि खूप उंचीवर असल्यामुळे सूर्य त्यांच्यामागे गेला तरी ढगांची सावली पडत नाही. ह्या ढगातील बहुसंख्य असलेल्या हिमकणांमुळे थोड्याफार प्रमाणात असलेल्या अतिथंड जलबिंदूचे रूपांतर हिमकणात होते. त्यामुळे असे तंतूराशीमेघ फार काळ टिकत नाहीत आणि अशा तंतूराशीमेघांचे रूपांतर तंतुस्तरमेघात होते.
तंतुराशीमेघ हे नेहमी तुकड्या तुकड्यांनी आढळून येतात. तंतुमेघ किंवा तंतुस्तरी मेघांबरोबर असे ढग संपूर्ण आकाशभर आढळून आल्यास आठ दहा तासांनंतर पावसाची शक्यता असते. तंतुमेघाबरोबर थोड्या प्रमाणात तंतुराशीमेघ आढळून आल्यास चांगली हवा पुढेही तशीच राहण्याचा अंदाज वर्तवला जातो. पावसानंतर असे ढग आढळल्यास हवा सुधारणार असल्याचे भाकीत केले जाते.
सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेस हे ढग आकाशात असल्यास त्यावरून प्रकाश परावर्तित होतो. हा प्रकाश विखुरलेला नसल्यामुळे असे परावर्तित किरण पिवळे किंवा लाल असतात. असे पिवळे तांबूस कोवळे किंवा सूर्यास्ताच्या वेळचे उन्ह असल्यामुळे त्यावेळचे आकाश सुंदर दिसते.
तंतुराशिमेघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.