गोवालिया टँक हा मुंबईतील मलबार हिल व कंबाला हिल ह्या टेकड्यांच्या पायथ्याशी असलेला भाग आहे.
एकोणिसाव्या शतकात मुंबईत अनेक पाण्याची तळी होती. सी पी टँक,नर्दुल्ला टँक, गोवालिया टँक, वगैरे नावाने ती ओळखली जात असत.हे तलाव श्रीमंत लोकांनी पुण्यकर्म म्हणून बांधलेले असत.गरीब लोक इथून पिण्यासाठी पाणी घेऊन जात असत.हल्ली ह्या तलावांपैकी बाणगंगा तलाव अस्तित्वात आहे. मलबार हिल व खंबाला हिल टेकड्यांवर पडलेला पाऊस खाली उतरून गोवालिया टँक मध्ये जमा व्हायचा.येथे गवळी लोक आपली गुरेढोरे घेऊन यायचे व गुरांना पाणी पाजायचे तसेच गुरांच्या आंघोळी करायचे. तलावावर येणाऱ्या गवळ्यांमुळे ह्या तलावाला गोवालिया टँक हे नाव पडले.इसवी सन १८२२ मध्ये गोवालिया तलावावर दक्षिण मुंबईतील शेवटचा वाघ दिसला होता.ह्या तलावाच्या आजुबाजूला पूर्वी श्रीमंत लोकांचे बंगले होते. येथेच सेठ गोकुळदास तेजपाल यांची संस्कृत पाठशाळा आणि बाजूला लक्ष्मी नारायणाचे देऊळ होते.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना सन १८८५ साली येथील तेजपाल सभागृहात झाली.हा तलाव नंतर बुझविण्यात आला आणि त्यावर गोवालिया टँक मैदान निर्माण केले. येथेच भारत छोडो आंदोलनाची इसवी सन १९४२ मध्ये सुरुवात झाली.अरुणा असफ अली यांनी येथे ९ ऑगस्ट १९४२ ला तिरंगा फडकविला. त्याच दिवशी येथे गोळीबार झाला होता. इसवी सन १९७० मध्ये येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले अध्यक्ष वि.स.पागे यांनी गांधी स्मारक बनविले.हल्ली ह्या मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात आणि बाजूला असलेल्या रस्त्याला ऑगस्ट क्रांती मार्ग म्हणून ओळखले जाते.ह्या परिसरात विल्सन कॉलेज,कंबाला हिल रुग्णालय,केम्प्स कॉर्नर,पेटिट सँन्टोरिम,डुंगरवाडी आहेत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म कंबाला हिल रुग्णालयात झाला होता. कंबाला हिल रुग्णालयाची स्थापना विख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर वि.ना.शिरोडकर यांनी केली होती. त्यांनी गर्भपात टाळण्यासाठी शोधलेल्या आणि केलेल्या शस्त्रक्रियेला शिरोडकर स्टिच म्हणून ओळखले जाते.
गोवालिया टँक
या विषयातील रहस्ये उलगडा.