गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ३० मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला असून गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो, यावरून आपल्याला एक गोष्ट जाणवते, कि गोव्यात अनेक धर्मांचे लोक एकोप्याने राहतात. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे गोवा हे राज्य आहे.
गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ किमी२ एवढे असून लोकसंख्या १४,५८,५४५ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या प्रमुख भाषा असून शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्य पिकवले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी असून गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.
पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीपर्यंत गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला.
निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे. कावी ही गोमंतकाची कला आहे.
गोवा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!