गुफी पेंटल (४ ऑक्टोबर, १९४४ - ५ जून, २०२३), मुळनाव सरबजीत सिंग पेंटल अहलुवालिया हे एक भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक होते. गुफी पेंटल हे शिक्षणाने एक अभियंता होते. १९६२ च्या भारत-चीन युद्धात ते भारतीय सेनेत गेले होते. चीनच्या सीमेवर कार्यरत असताना तेथे रामलीला आयोजित केली जात असे, ज्यात गुफी पेंटल हे सीतेची भूमिका करत असत. यातून त्यांना अभिनयाची ओढ लागली. त्यांचे धाकटे बंधू पेंटल यांच्या पाठोपाठ गुफी देखील अभिनय क्षेत्राकडे वळले. १९६९ मध्ये मुंबईत आल्यावर, गुफी यांनी मॉडेलिंग, चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक तसेच चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. गुफी यांची बीआर चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतील शकुनी मामाची भूमिका खूप गाजली होती. स्वतः पेंटल यांनी त्यांची आपल्या आयुष्यातील ही सर्वोत्कृष्ट भूमिका आहे असे म्हणले होते. महाभारतातील त्यांच्या शकुनी पात्राशी ते इतके जोडले गेले होते की त्यांनी सहारा समय या वृत्तवाहिनीवर शकुनीच्या पात्रात राजकीय चर्चेचा कार्यक्रम सादर केला होता.
पेंटल यांनी चैतन्य महाप्रभू या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट १६व्या शतकातील कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाला रवींद्र जैन यांचे संगीत होते. तर या चित्रपटाचे पवन कुमार हे निर्माते होते. २०१० मध्ये महाभारत मालिकेतील सहकलाकार पंकज धीर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील अभिन्नय अॅक्टिंग अकादमीमध्ये सुविधा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते.
गुफी पेंटल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.