गिजुभाई बधेका

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गिजुभाई बधेका (१५ नोव्हेंबर, १८८५ – २३ जून, १९३९) हे बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील एक आद्य प्रवर्तक होते. त्यांचा जन्म चितळ (सौराष्ट्र) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगवानजी व आईचे नाव काशीबा होते. गिरिजाशंकर ऊर्फ गिजुभाई यांचे प्राथमिक शिक्षण वेळा येथे व त्यानंतरचे शिक्षण भावनगर येथे झाले. १९०५ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते भावनगर येथे त्यांचे मामा हरगोविंद पंड्या यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांनी सामळदास महाविद्यालयामध्ये गिजुभाईंचे नाव दाखल केले; परंतु तेथील अभ्यासक्रम पूर्ण न करताच त्यांनी महाविद्यालय सोडले व उपजीविकेसाठी १९०७ मध्ये आफ्रिकेस प्रयाण केले आणि तेथील सॉलिसिटरच्या कंपनीत काम केले. तेथील तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर १९१० साली ते भारतात परतले. त्यांनी आफ्रिकेतील अनुभवांवर आधारित अशी प्रवासवर्णने लिहिली. भारतात परतल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास केला व १९११ पासून वकिलीचा व्यवसाय सुरू केला. पुढे हा व्यवसाय सोडून भावनगर येथील 'श्री दक्षिणामूर्ती' या संस्थेत त्यांनी साहाय्यक अधीक्षक म्हणून नोकरी पत्करली. कालांतराने ते त्या संस्थेत प्राचार्य झाले. १९०२ साली ते हरिबेन यांच्याशी विवाहबद्ध झाले. हरिबेन यांच्या निधनानंतर १९०६ साली जदिबेन यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. नरेंद्रभाई हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →