महाराष्ट्रातील हिंदू-गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गोपालन (गाय) व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे.गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत,“गवळी" ही "यादव" समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे.”, ज्यांचा संबंध यादव कुळा शी जोडला जातो आणि "भगवान श्रीकृष्णा" चे वंशज मानले जाते,
कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख..
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात.
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
गवळी समाज
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.