कोकणातील लोकभाषा आणि बोलीवैविध्य

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कोकणातील लोकभाषा आणि बोलीवैविध्य

कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एकसंध भाषिक प्रदेश नसून येथे भौगोलिक, सामाजिक आणि ऐतिहासिक घटकांनुसार विविध भाषाप्रकार आणि बोलीरूपे आढळतात. उत्तर कोकणातील आगरी, कोळी आणि वाडवळी यांसारख्या भाषिक रूपांपासून रत्‍नागिरीतील संगमेश्वरी व बाणकोटी आणि दक्षिण कोकणातील कुडाळी, मालवणी तसेच कोंकणीच्या विविध रूपांपर्यंत या प्रदेशात भाषिक वैविध्य दिसून येते. या वैविध्यामध्ये मराठी, कोंकणी आणि त्यांच्यातील संक्रमणशील भाषिक रूपांचा ऐतिहासिक भाषासंपर्क महत्त्वाचा ठरतो. ग्रीअर्सन यांच्या Linguistic Survey of India मधील नोंदी आणि नंतरच्या बोलीसर्वेक्षणांत या विविधतेचे वेगवेगळ्या पद्धतीने दस्तऐवजीकरण झाले आहे.

ग्रीअर्सन यांच्या १९०५ च्या सर्वेक्षणात ठाण्याच्या कोकण-प्रमाणापासून (Konkan Standard) पुढे आगरी, कुणबी, भंडारी, ठकरी, संगमेश्वरी, बाणकोटी आदी भाषिक रूपांची नोंद करण्यात आली होती. त्याच वर्गीकरणात राजापूरच्या दक्षिणेकडील कोंकणी आणि कुडाळी ख्रिस्ती कोंकणी यांसारख्या भाषिक रूपांची स्वतंत्र नोंद आढळते. आधुनिक भाषावैज्ञानिक अभ्यासात मात्र या ऐतिहासिक वर्गीकरणांचे पुनर्मूल्यांकन केले गेले असून कोकणातील भाषिक प्रकारांमधील भौगोलिक संक्रमण, भाषासंपर्क आणि कालानुसार झालेला बदल यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला आहे.

मराठी आणि कोंकणी यांच्यातील संबंधांचे वर्गीकरण हे ऐतिहासिकदृष्ट्या वादग्रस्त राहिले आहे. १९०१ च्या जनगणनेतील भाषाविषयक नोंदींपासून पुढे कोंकणी आणि मराठीच्या परस्परसंबंधां विषयी विविध मते नोंदवली गेली, तर १९७१ च्या कोंकणी सर्वेक्षणात महाराष्ट्रातील कोंकणी भाषिक समूह, त्यांचे सामाजिक घटक आणि विविध भाषिक रूपे स्वतंत्रपणे नोंदविण्यात आली आहेत. डेनिस कुर्झन यांनीही कोंकणीची भाषिक स्थिती आणि मराठी–कोंकणी विवादाचा स्वतंत्र समाज भाषा वैज्ञानिक आढावा घेतला आहे. त्यामुळे “कोंकणी” आणि “कोकणातील मराठी बोली” हे समानार्थी मानणे योग्य ठरत नाही; प्रत्येक भाषिक रूपाचे वर्गीकरण त्याच्या ऐतिहासिक, भौगोलिक आणि भाषिक वैशिष्ट्यांच्या संदर्भात वेगळे सांगण्यात आले आहे.

आधुनिक Survey of Dialects of the Marathi Language (SDML) मध्ये महाराष्ट्रातील समकालीन मराठीच्या प्रादेशिक विविधतेचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात आले असून. या सर्वेक्षणामुळे ऐतिहासिक ग्रीअर्सन सर्वेक्षणातील नोंदींची आधुनिक भाषिक वापराशी तुलना करणे शक्य झाले आहे. विशेषतः कोकणातील संगमेश्वर, मालवण आणि सिंधुदुर्ग परिसरातील भाषिक रूपांमध्ये कालानुसार झालेला बदल आणि प्रमाण मराठीशी झालेला संपर्क आधुनिक अभ्यासातून स्पष्ट होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →