केट गॅरी हडसन (जन्म: १९ एप्रिल १९७९) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका व गीतकार आहे. ही गायक बिल हडसन आणि अभिनेत्री गोल्डी हॉन यांची मुलगी आहे. तिने १९९८ च्या डेझर्ट ब्लू या नाट्यपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, व त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. कॅमेरॉन क्रो यांच्या संगीत नाट्यपट ऑलमोस्ट फेमस (२०००) मध्ये पेनी लेनच्या भूमिकेसाठी तिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले.
२००० च्या दशकात, हडसनने हाऊ टू लूझ अ गाय इन १० डेज (२००३), यू, मी अँड डुप्री (२००६), फूल्स गोल्ड (२००८) आणि ब्राइड वॉर्स (२००९) या प्रणय-विनोदी चित्रपटांमध्ये काम केले. दूरचित्रवाणीवर तिने ग्ली (२०१२-१३) या संगीत मालिकेत भूमिका केली आणि थरार मालिका ट्रुथ बी टोल्ड (२०२२) आणि रनिंग पॉइंट (२०२५) मध्ये मुख्य भूमिका केल्या. तिच्या इतर प्रमुख चित्रपटांमध्ये द स्केलेटन की (२००५), नाइन (२००९), रॉक द कसबा (२०१५), डीपवॉटर होरायझन (२०१६) आणि मदर्स डे (२०१६) यांचा समावेश आहे. म्युझिक (२०२१) आणि सॉन्ग संग ब्लू (२०२५) मधील तिच्या अभिनयासाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. नंतरच्या चित्रपटांसाठी, हडसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले.
हडसन ही "टेकस्टाईल फॅशन" समुहाद्वारे चालवल्या जाणाऱ्या फिटनेस ब्रँड आणि सदस्यता कार्यक्रम "फॅबलेटिक्स" याची सह-संस्थापक आहे. ती प्रीटी हॅपी: हेल्दी वेज टू लव्ह युअर बॉडी (२०१६) आणि प्रीटी फन: क्रिएटिंग अँड सेलिब्रेटिंग अ लाइफटाइम ऑफ ट्रेडिशन (२०१७) या ललितेतर साहित्य पुस्तकांची लेखिका देखील आहे. हडसनने २०२४ मध्ये तिचा पहिला स्टुडिओ संगीत अल्बम, ग्लोरियस, हा प्रकशित केला होता.
केट हडसन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.