कांचीपुरम सिल्क साडी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कांजीवरम साडी ही भारताच्या तमिळनाडू प्रांतातील कांचीपुरम येथील विणकर विणतात.

कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य म्हणजे रुंद आणि साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट करणाऱ्या रंगांचे काठ. या साडीची किंमत २५०० पासून सहा लाख रुपयांपर्यंत असते. पर्यंत असते. साडीमधले सुंदर नक्षीकाम, रंगसंगती, साडी विणण्याची पद्धत आणि त्यामध्ये वापरलेले रेशीम, खरी जर इत्यादी घटकांनुसार साडीची किंमत ठरते. या कांचीपुरम साडीला २००५ सालापासून ‘भौगोलिक स्थानदर्शक’ प्रमाणपत्र देऊन संरक्षण देण्यात आले आहे.

कांजीवरम साडी साडी विणायला नेहमी तीन विणकर लागतात. या साडीच्या काठाचे नक्षीकाम आणि रंग हे त्या साडीच्या मध्य भागातील रंगापेक्षा पूर्णतः वेगळे असते. साडीचा पदर अगदी भिन्न रंगाने आणि स्वतंत्रपणे विणला जातो. पदर विणून झाल्यावर तो अतिशय नाजूकपणाने साडीला जोडला जातो. मूळ साडी आणि पदर जिथे जोडला जातो तिथे नागमोडी आकाराची सूक्ष्म रेषा दिसते. या साडीत टेम्पल बॉर्डर, चेक्स (चौकडे), पट्टे आणि बुट्टे विणलेले असतात. ही साडी विणताना अतितलम रेशमाचा व बहुधा खऱ्या जरीचाच वापर केला जातो.

इतर साड्यांची रुंदी ४५ इंच असते तर कांजीवरम ४८ इंच रुंद असते.

कांजीवरम साडीच्या नक्षीकामांत सूर्य, चंद्र, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नाणी, आंबे, पाने, जाई-जुईच्या कळ्या अशा प्रकारच्या आकारांचा समावेश असतो. या साडीचा वापर प्राधान्याने लग्नासारख्या मोठ्या सणां-समारंभांत होतो.

पौराणिक कल्पनांनुसार कांजीवरम साडीच्या विणकरांना महर्षी मार्कंडेयाचे वंशज समजले जाते. ते पुराणकाळी कमळाच्या फुलांच्या रेषांपासून ही साडी देवतांसाठी तयार करत असत. वर्तमान कांजीवरम साडी राज कृष्णदेव रायच्या वेळेपासून तिच्या श्रेष्ठतम कारागिरीसाठी प्रसिद्ध झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →