औसा किल्ला हा औसा शहराच्या दक्षिणेस ५.५२ हेक्टर क्षेत्रात उभा असलेला भुईकोट किल्ला आहे. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याची बहामनीचा मुख्य वजिर म्हणुन नियुक्ती झाली. आपल्या वजिरीच्या काळातच त्याने औसा किल्ला बांधला. खोलगट भागात असलेल्या या किल्याचा मुख्य भाग लपलेला दिसतो. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्यातील काही वास्तु व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो.
औसा शहराला ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरीशत असे आहे. उच्छीव त्वरीशत हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने "औच्छ" असा उल्लेख केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकामर हा औसाचा रहिवासी होता. त्याने "करकंड चरयू" हा काव्यग्रंथ लिहिला आहे. या कव्याग्रंथात त्याने औसा या नगराची "असई" असा उल्लेख केला आहे. प्राचीन काळापासून उच्छीव, औच्छ, असई, औसा अशी नवे रूढ झाली असावीत. यादव कालीन खोलेश्वराच्या काळातील अंबाजोगाई शिलालेख (शके ११५०) यात उदगीर बरोबर औसाचीही नोंद आहे. यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते.
औसा किल्ला
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.