प्रतिकूल परिणामांचा, विशेषतः औषधांच्या दीर्घकालिक व अल्पकालिक अनुषंगिक परिणामांचा शोध, निर्धारण, आकलन आणि प्रतिबंधन यांच्याशी संबंधित औषधशास्त्राची शाखा म्हणजे औषधसतर्कता होय. साधारणतः औषधे, जैविक साधने, वानस्पतिक उपचार व पारंपरिक उपचार यांच्या प्रतिकूल परिणामांबद्दल वैद्यकव्यवसायींकडून व रुग्णांकडून माहिती गोळा करण्याचे, देखरेखीचे, संशोधनाचे, निर्धारणाचे आणि मूल्यांकनाचे काम या शास्त्रात केले जाते. या कार्याचे दोन उद्देश असतात :
औषधांशी संबंधित धोक्यांबद्दल नवी माहिती मिळविणे
रुग्णांना होणारी इजा टाळणे.
औषधसतर्कता चिकित्साशास्त्रीय अवस्थेपासून सुरू होते आणि औषधाच्या उत्पादन आयुष्यचक्रात सुरूच राहते. पणनपूर्व औषधसतर्कता (चिकित्साशास्त्रीय अवस्थेतील) आणि पणनोत्तर औषधसतर्कता अशा दोन भागांमध्ये ही सतर्कता विभागली जाते. औषधाला मान्यता मिळण्यापूर्वी, चिकित्साशास्त्रीय संपरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यातच सतर्कतेबद्दल माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते आणि मान्यनेनंतरही ही प्रक्रिया सुरू राहिते. जगभरातील अनेक औषध नियंत्रण संस्थांनी अनेक पणनोत्तर सुरक्षितता अभ्यास अनिवार्य केलेले आहेत.
प्रतिकूल औषध प्रतिक्रियांवर सतर्कतेत विशेष लक्ष दिले जाते. प्रतिकूल औषध प्रतिक्रियेची अधिकृत व्याख्या "सामान्यतः प्रतिबंधासाठी, निदानासाठी, उपचारासाठी किंवा शरीरक्रियाशास्त्रीय सुधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य मात्रेतच औषधाला मिळालेला अपायकारक व अवांछित प्रतिसाद, ज्यात गुणकारितेच्या अभावाचाही समावेश होतो. यात अतिमात्रेचा व गैरवापचाराही समावेश होतो." अशी आहे.
चिकित्साशास्त्रीय संपरीक्षणांमध्ये काही हजार रुग्णांचाच समावेश होत असल्याने औषधाचा जेव्हा बाजारात प्रवेश होतो तेव्हा त्याचे काही अनुषंगिक परिणाम आणि प्रतिकूल प्रतिक्रिया अज्ञात असतात. अभ्यासातील लोकसंख्या मर्यादित असल्याने यकृत इजेसारख्या गंभीर प्रतिक्रियाही लक्षात आलेल्या नसतात. पणनोत्तर संनिरीक्षण उत्स्फूर्त निवेदन पद्धतीतून आणि रुग्ण निबंधणीतून माहिती खोदून काढणे आणि औषधे व प्रतिकूल प्रतिक्रियांमधील संबंध ठरविण्यासाठी रुग्ण अहवालांची चौकशी करणे अशा साधनांचा वापर करते.
औषधसतर्कता
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.