इस्मत चुगताई या प्रसिद्ध उर्दू लेखिका होत्या. त्यांचे शिक्षण अलीगढ व लखनौ येथे झाले. त्यांनी बी.ए., बी.टी. झाल्यावर बरेली व जोधपूर येथे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईत शाळा-निरीक्षकेचे व शाळा-अधिक्षिकेचे काम केले. १९४२ साली त्यांचा विवाह शाहीद लतीफ यांच्याशी झाला. त्यांच्या घरचे एकूण वातावरणच वाङ्मयीन होते. त्यांचा भाऊ अझीम बेग हा एक प्रसिद्ध विनोदी लेखक होता. इस्मत चुगताईंनी उर्दू तसेच इंग्रजी व रशियन साहित्याचे विपुल वाचन केले. बर्नार्ड शॉच्या लेखनाने प्रभावित होऊन त्यांनी फसादी हे आपले पहिले नाटक लिहिले. आपल्या सुरुवातीच्या कथा अश्लील वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच फाडून टाकल्या; परंतु नंतरच्या कथांपैकी काही त्यांतील धिटाई आणि वाङ्मयीन गुण यांमुळे लोकप्रिय झाल्या. त्यांच्या ‘लिहाफ’ नामक कथेवर लाहोरच्या न्यायालयात अश्लीलतेचा खटला भरण्यात आला होता. ‘लिहाफ’ या कथेतल्याप्रमाणे आपल्या लेखनात त्या लैंगिक प्रसंगांचे व अनैतिक संबंधांचे निर्भीडपणे चित्रण करतात.मध्यमवर्गीय मुस्लिम युवतींच्या मानसिक अवस्थेचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आणि सखोल आहे. प्रेम आणि वासना यांच्याबद्दलच्या रूढ कल्पनांचा त्या उपहास करतात. ‘बहुबेटिया’ मध्ये आपल्या विवाहपद्धतीचा उपहास करून वैवाहिक संबंधातील विसंवादाची सूचक मीमांसा त्यांनी केलेली आहे. सौंदर्य, स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक रूढी आणि संकेत या संबंधीच्या आजच्या विचारपद्धतीत इस्मत चुगताईंना क्रांतिकारक बदल करावयाचा होता.. पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीजीवनाची शोकात्म बाजूच आपल्या कथा-कादंबऱ्या लिहिण्यास त्यांना प्रेरक ठरली. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि व्याजोक्तिपूर्ण सूर यांमुळे त्यांच्या कथा-कादंबऱ्यांना आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इस्मत चुगताई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!