इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान चार कसोटी सामने, पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली आणि एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. ठरल्याप्रमाणे एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामने सप्टेंबर २०२० मध्ये खेळविले जाणार होते परंतु भारतात पसरलेल्या कोरोनाव्हायरसमुळे आणि त्यानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला. डिसेंबर २०२० मध्ये बीसीसीआय ने पत्रकार परिषद घेऊन फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये भारत सरकारची परवानगी मिळताच तीन मैदानांवर सगळे सामने आयोजित केले आहेत असे जाहीर करून दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले.

दौऱ्यातील अहमदाबाद येथील तिसरी कसोटी ही दिवस/रात्र आयोजित केली गेली. १ जानेवारी २०२१ रोजी भारत सरकार ने सर्व क्रीडा मैदानांवर ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी दिली. परंतु पहिले दोन कसोटी सामने चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार असल्याने तमिळ नाडू क्रिकेट असोसिएशनने दोन्ही कसोटींसाठी मैदानांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश निषिद्ध केला.

कसोटी मालिकेतील पहिली कसोटी कर्णधार ज्यो रूटच्या उत्तम अश्या २१८ धावांच्या खेळीच्या जोरावर जिंकत इंग्लंडने दौऱ्याला धमाकेदार सुरुवात केली. पहिली कसोटी ही ज्यो रूटची १००वी कसोटी होती. तसेच कारकिर्दीतल्या १००व्या कसोटीत द्विशतक झळकवणारा ज्यो रूट जगातला पहिला खेळाडू ठरला. दुसऱ्या कसोटी भारताने ३१७ धावांनी जिंकली आणि मालिकेतील आव्हान कायम राखत पुनरागमन केले. भारताचा रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेट प्रकारात २०० डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा पहिला खेळाडू ठरला. दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने पदार्पणातच एका डावात ५ गडी बाद करणारा भारताचा ९वा खेळाडू बनला. तिसरी कसोटी अहमदाबाद येथे पुर्नबांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिवस/रात्र पद्धतीने खेळविण्यात आली. तिसरी कसोटी ही भारताच्या इशांत शर्माची १००वी कसोटी होती. त्यावेळेस भारताचे तत्कालिन राष्ट्रपति रामनाथ कोविंद आणि भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी इशांत शर्माला मानाची टोपी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. तिसरी आणि चौथी कसोटी भारताने जिंकली. कसोटी मालिकेत ३-१ असा विजय मिळवत भारतीय संघ २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. तसेच अँथनी डि मेल्लो चषकसुद्धा भारताने राखला.

ट्वेंटी२० मालिकेत इंग्लंडने विजयासह सुरुवात केली. ४ सामने झाल्यानंतरची मालिकेची स्थिती २-२ अशी होती. भारताने मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना जिंकत ५ सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-२ अशी जिंकली. भारताचा कर्णधार विराट कोहली हा ट्वेंटी२० मध्ये ३,००० धावा करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला. तिसरा ट्वेंटी२० सामना आयॉन मॉर्गनचा १००वा ट्वेंटी२० सामना होता, १०० ट्वेंटी२० सामने खेळणारा मॉर्गन इंग्लंडचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला. एकदिवसीय मालिकेत भारताने पहिला सामना ६६ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा ६ गडी राखत पराभव केला आणि पुनरागमन केले. दोन सामन्यांनंतर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत होती. भारताने तिसरा आणि निर्णायक सामन्यात विजय संपादन करत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →