अष्टाध्यायी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अष्टाध्यायी हा पाणिनी ह्यांनी लिहिलेला संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथात आठ अध्याय असून त्यांवरूनच अष्टाध्यायी हे नाव ह्या ग्रंथाला मिळाले आहे. संस्कृत भाषेच्या व्याकरणावर विविध ग्रंथ लिहिले गेले असले तरी अष्टाध्यायीच्या अध्ययनाची परंपरा आजवर चालत आलेली आहे. तसेच ह्या ग्रंथाला इतर संस्कृत व्याकरणाच्या ग्रंथांच्या तुलनेत अधिक कीर्ती लाभली आहे.

अष्टाध्यायी ह्या ग्रंथावर वार्तिके, टीका, भाष्ये अशा स्वरूपाचे अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यातून पाणिनीय व्याकरणपरंपरा ह्या नावाने ज्ञात असलेली परंपरा निर्माण झाली. जगभरातील अनेक अभ्यासकांनी ह्या ग्रंथाविषयी आणि ह्या ग्रंथाद्वारे पुढे निर्माण झालेल्या परंपरेविषयी चिकित्सक स्वरूपाचे लेखन केले आहे. भाषाभ्यासाच्या काही परंपरांवर ह्या पाणिनीय परंपरेचा प्रभाव पडलेला आहे.

हा ग्रंथ विलक्षण तांत्रिक स्वरूपाचा असून भाषेचे (लक्ष्य भाषेचे) व्याकरण सांगण्यासाठी जणू काही दुसरी भाषाच (अधिभाषा) ह्या ग्रंथात वापरली आहे. ही भाषा आत्मसात केल्यावाचून ह्या ग्रंथाचा बोध होत नाही. ह्या तांत्रिक वैशिष्ट्यांमुळेच हा ग्रंथ अधिक लक्षणीय ठरला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →