अशेरीगड

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अशेरीगड हा पालघर जिल्ह्यातील गड आहे.

ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुका आजही गडकोटांनी समृद्ध असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. मुंबई- ठाणे शहरातील बहुतेक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना पालघर तालुक्यातील गडकोट मात्र लहान लहान डोंगररांगांवर अजूनही आपले अस्तित्त्व टिकवून बऱ्यापैकी अवस्थेत उभे आहेत.ठाणे जिल्ह्यातील पालघर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो.पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात ‘दादा’ असा वाटावा असा हा अशेरीगड. आकार प्रचंड असल्याने या गड बुलंद वाटतो.

ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात येणाऱ्या किल्ल्यांपैकी अशेरीगड किल्ल्याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो. किल्ल्याला अशिरगड असेही संबोधले जाते. इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते.अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे १४व्या शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून तो बळकाविला. या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून १७३७ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. १८१८ नंतर अशेरीगड इंग्रजांच्या हाती गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →