अमिताभ बच्चन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन (जन्म : ११ ऑक्टोबर १९४२) हे एक भारतीय चित्रपट अभिनेते, चित्रपट निर्माते, दूरदर्शन सूत्रसंचालक, माजी राजकारणी आहेत जे त्यांच्या हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. १९७०-८० च्या दरम्यान, ते भारतीय चित्रपटातील सर्वात प्रभावी अभिनेते होते ; फ्रेंच दिग्दर्शक फ्रँकोइस ट्रूफॉट यांनी त्यांना "One-man industry" (एक-पुरुष उद्योग) म्हणले.

अमिताभ यांचा जन्म 1942 मध्ये अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण नैनिताल येथे आणि दिल्ली विद्यापीठातील किरोरी माल महाविद्यालयात झाले. १९६९ मध्ये भुवन शोम या चित्रपटात आवाज निवेदक म्हणून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. त्यांनी 1970च्या दशकाच्या सुरुवातीला जंजीर, दीवार आणि शोले यांसारख्या चित्रपटांसाठी लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा "अँग्री यंग मॅन" म्हणून संबोधले गेले.

अमिताभ यांना बॉलीवूडचा शहेनशाह (त्यांच्या 1988 मधील शहेनशाह चित्रपटाच्या संदर्भात), महानायक, स्टार ऑफ द मिलेनियम, किंवा बिग बी म्हणून संबोधले गेले. त्यांनी पाच दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत 200हून अधिक भारतीय चित्रपटात काम केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी एकूण १६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत, तसेच एकूण ४२ नामांकनांसह, फिल्मफेरमधील कोणत्याही प्रमुख अभिनय श्रेणीमध्ये ते सर्वाधिक नामांकित कलाकार आहेत.

अभिनयासोबतच बच्चन यांनी पार्श्वगायक, चित्रपट निर्माता आणि दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी गेम शो "कौन बनेगा करोडपती"चे अनेक सीझन होस्ट केले आहेत. १९८० च्या दशकात त्यांनी काही काळ राजकारणातही प्रवेश केला होता.

भारत सरकारने त्यांना कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान, "नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.

भारतीय उपखंडाच्या बाहेर त्यांचे आफ्रिका (दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका आणि मॉरिशस), मध्य पूर्व (विशेषतः यूएई आणि इजिप्त), युनायटेड किंग्डम, यासह दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी चाहते आहेत. रशिया, कॅरिबियन (गियाना, सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो), ओशनिया (फिजी, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड) आणि युनायटेड स्टेट्स येथेही खूप मोठ्या प्रमाणात बच्चन यांचे चाहते आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →